*विघ्नहर टाइम्स वृतसेवा*
बोरी जिल्हा परिषद गटामध्ये कल्पना काळे कविता पवार व जयश्री खंडागळे असा तिरंगी सामना होत असून या गटात विजय आपलाच होणार असा दावा सर्व उमेदवाराचे कार्यकर्ते करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असताना देखील पांडुरंग पवार यांनी आपल्या सुनबाई कविता पवार यांना अपक्ष उमेदवार उभे केल्याने त्यांचे पक्षातून निलंबन केले आहे. त्याचा त्यांना फायदा होतो की तोटा हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. माऊली खंडागळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मशाल खाली ठेवून धनुष्यबाण हातात घेतलाय व आपल्या पत्नीला जिल्हा परिषद निवडणुकीत उतरवले आहे त्यांचा मूळ मतदार संघ नारायणगाव असताना ते या मतदारसंघात आल्याने मतदार त्यांना कितपत स्वीकारतात? याबाबतही वेगवेगळी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. मशाल खाली ठेवल्याचा व धनुष्यबाण हाती घेतल्याचा त्याचा कितपत फायदा होईल की तोटा? हे सुद्धा निकालानंतर सगळ्यांच्या लक्षात येईल. तथापि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गद्दारी केली ही त्यांच्यावर होत असलेले टीका सध्या त्यांना मात्र सहन करावी लागत आहे. कल्पना काळे यांनी सध्या प्रचारामध्ये चांगला जोर पकडला असून त्यांचे कार्यकर्ते विजयाचा दावा करीत आहेत. उमेदवार स्वतः उच्चशिक्षित असल्यामुळे त्याचा फायदा अधिकचा होईल असे काळे समर्थक कार्यकर्त्यांना वाटत आहे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे विजयाचा मार्ग सोपा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत आहेत. माऊली खंडागळे यांचे समाजकार्य चांगलं आहे. तथापि पक्षांतराचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार शरद सोनवणे त्यांच्या सोबतीला असल्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागेल असे शिवसैनिक सांगत आहेत. पांडुरंग पवार यांचे व्यक्तिगत काम व स्वच्छ प्रतिमा एक सुसंस्कृत कुटुंब अशी प्रतिमा असल्याने विजयाचा दावा त्यांचे देखील कार्यकर्ते करताना दिसत आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला दगा दिल्याने त्याचा फटका त्यांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे.