बिबट्याला गोळ्या घाला – खा.डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी

नारायणगाव : (प्रतिनिधी )जांबूत, पिंपरखेड परिसरातील नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे केली.

पिंपरखेड येथे आज रोहन विलास बोंबे या १० वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वनविभागाचे वाहन आणि कार्यालय पेटविले. या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्यासाठी एलिमिनेशन ऑर्डर काढण्यासाठी  चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, राज्य सरकार तसेच संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी केली.

पिंपरखेड येथे अवघ्या १० दिवसात २ लहानग्या निष्पाप जीवांचा बळी गेला, तर महिनाभरात ही तिसरी घटना घडली असे असूनही राज्य सरकार उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याकडे दुर्लक्ष करीत आहे, ही अतिशय चीड आणणारी बाब असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटले असून भरदिवसा माता-भगिनी आणि लेकरांचा बळी जात असताना सरकार निष्ठूरपणे बघत आहे. त्यामुळेच आज नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की, यापुढे एकही क्षण न दवडता आमच्या जिवाभावाच्या माणसांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

जाहिरात

error: Content is protected !!