भीमाशंकर साखर कारखान्याची पहिली उचल 3100 रुपये. ऊस उत्पादक शेतकरी आनंदीत.

नारायणगाव (प्रतिनिधी ) आंबेगाव आंबेगाव भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसास पहिला हप्ता रु.३१००/- प्रती मे. टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या वतीने कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे उपाध्यक्ष प्रदीप वळसे यांनी संयुक्तिक दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे व प्रदीप वळसे म्हणाले की, गळीत हंगाम सन २०२५-२६ चे धोरण ठरविणेसाठी दि. २५/०९/२०२५ रोजी झालेल्या मंत्री समितीच्या धोरणानुसार मागील हंगामाचे सरासरी १२% साखर उता-यानुसार निव्वळ एफ.आर.पी. रु. ३२७२.१४ प्र.मे.टन येत आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार पहिल्या हप्त्यापोटी रु. ३१००/- प्र.मे.टन पंधरवडा बिलाप्रमाणे शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे. उर्वरित रक्कम रु. १७२.१४ प्र.मे.टन देखील निधी उपलब्धतेनुसार शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
ऊस तोडणी झालेनंतर शेतक-यांच्या खात्यावर एफ.आर.पी. कायद्यानुसार ऊस पेमेंट अदा करणे आवश्यक आहे, परंतु सद्यस्थितीत बँकेकडून साखर उत्पादनावर उपलब्ध होत असलेली रक्कम व उपपदार्थ विक्रीतून उपलब्ध होत असलेल्या रक्कमेतून प्रक्रिया खर्च, तोडणी मजुरांची देणी, वाहतूकदार पेमेंट, कर्मचारी कामगार पगार इ. देखील भागविणे आवश्यक असल्याने संचालक मंडळाने तूर्त रु. ३१००/- प्र.मे.टन देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने नेहमीच फक्त एफ.आर.पी.च नाही तर त्यापेक्षाही जास्त ऊस दर दिलेला असून कधीही ऊस दराबाबत तडजोड केलेली नाही.
दरवर्षी ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून विविध कार्यकारी सोसायटीची वसुली सक्तीने करण्यात येत असे तथापी शासनाचे शेतक-यांच्या कर्ज माफीच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांच्या विनंतीनुसार वसुली सक्तीची न करता संमतीपत्र घेवून ऐच्छिक पद्धतीने करणेबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऊस पेमेंटमधून सोसायटी कर्जाची कपात करावी किंवा नाही याबाबत संबंधीतांनी सोसायटी व बँकेस कळविणे आवश्यक आहे.

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगला व पारदर्शक आणि शेतकरी हिताचा कारभार करीत असल्याने ऊस उत्पादकांनी आपला उत्पादित केलेला सर्व ऊस भीमाशंकर कारखान्याला गाळपास द्यावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे यांनी केले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!