शरद पवारांची साथ सोडल्याने बेनकेंचा पराभव…? कोल्हे व सोनवणे यांची एकमेकाला टाळी.

नारायणगाव : (प्रतिनिधी)

जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथे झालेल्या एका कार्यक्रमात पिंपरी पेंढारचे माजी सरपंच रोहिदास वेठेकर यांनी माजी आमदार अतुल बेनके यांच्या पराभवाचं खरं कारण थेट मंचावर उघड केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी आमदार असलेल्या अतुल बेनकेंच्या पराभवाला त्यांनी शरद पवारांची साथ सोडल्याचं कारणीभूत ठरवलं.
यावेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे आणि स्वत: अतुल बेनके उपस्थित असताना वेठेकरांनी कोणतीही भीडभाड न ठेवता बेनकेंच्या तोंडावरच सत्य बोलून दाखवलं. हे ऐकून व्यासपीठावरील कोल्हे आणि सोनवणेंनी मनातील खदखद व्यक्त करत टाळी वाजवली आणि बेनकेंसमोरच हलकीशी हास्यसुद्धा फुलवली.या क्षणाने स्पष्ट केलं की जनतेच्या मनात आणि कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही शरद पवारांविषयी असलेली निष्ठा जिवंत आहे, आणि तीच निष्ठा सोडल्यानेच बेनकेंचा पराभव निश्चित झाल्याचे म्हटले जाते. त्यावेळेस बेनके यांनी जुन्या कार्यकर्त्यांचे ऐकले नाही, अशाही कान पिचक्या वेठेकर यांनी बेनके यांना दिल्या. बेनके कुटुंबाशी आमचा कायम घरोबा आहे याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. एवढेच नाही तर शरद सोनवणे जन्माला यायच्या अगोदर वेठेकर व सोनवणे कुटुंबांचे सबंध असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान सध्या खासदार अमोल कोल्हे व माजी आमदार अतुल बेनके यांची जवळीक वाढले आहे त्याचबरोबर विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व खासदार कोल्हे यांच्यात दुरावा दिसू लागला आहे. आज पिंपरी पेंढर येथे असलेल्या कार्यक्रमात हे दोघे एकत्र येऊ शकत होते. कोल्हे, सोनवणे, बेनके व शेरकर हे या कार्यक्रमाला एकत्र येणार अशा प्रकारचे फ्लेक्स गावात लावण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पत्रिका देखील तालुकाभर वाटल्या होत्या. परंतु सत्यशील शेरकर यांनी या कार्यक्रमाला सकाळीच हजेरी लावून दुसऱ्या कार्यक्रमाचे निमित्त पुढे करून निघून गेले. त्यामुळे आज देखील सत्यशील शेरकर यांनी खासदार कोल्हे यांना चकवा दिल्याची चर्चा कार्यकर्त्यामध्ये होताना दिसत होती.

जाहिरात

error: Content is protected !!