नारायणगाव :
कांद्याच्या बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र हा देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य असून देशाच्या एकूण कांदा उत्पादनात राज्याचा मोठा वाटा आहे. नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यांसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर व हवेली तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला केवळ ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून काही ठिकाणी हा दर आणखी कमी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. उत्पादन खर्च, वाहतूक, औषधे, मजुरी व साठवणूक खर्च लक्षात घेतल्यास शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.
या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून नाफेड व एनसीसीएफमार्फत मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कांदा खरेदीवरील मर्यादा वाढवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा, असेही त्यांनी सुचविले आहे.
याशिवाय कांद्याच्या साठवणुकीसाठी अनुदान, शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल आर्थिक मदत, तसेच रासायनिक खतांवरील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. कांदा निर्यातीबाबत स्थिर धोरण आखून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.