अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा आ. दिलीप वळसे पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश.

विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागांची माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान मोठे असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा असा आदेश आमदार दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी त्यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देत नुकसानाचा अहवाल लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. “अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळाली पाहिजे. नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,” असे आश्वासन वळसे-पाटील यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात प्रभारी तहसीलदार सचिन वाघ, मार्केट कमिटीचे सभापती निलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक अध्यक्ष वैभव उंडे,खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, अजय आवटे, महेंद्र वाळुंज यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव, खडकवाडी, पोंदेवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडी फाटा, लोणी, रानमळा, रोडेझाप, धुमाळस्थळ आदी गावांना गारपीटीचा जोरदार फटका बसला. सायंकाळी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आणि सुपारीएवढ्या गारा कोसळल्याने रस्ते, शेत, गोठे आणि घरांच्या अंगणात गारांचा खच साचला.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने ओढे-नाले तुडुंब भरले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला असून काढणीसाठी ठेवलेला कांदा भिजला आहे, तर उभ्या पिकांचे शेंडे मोडून पडले आहेत. कांद्याच्या बिजोत्पादनालाही मोठा धक्का बसला आहे.
तसेच काढणीस आलेला गहू व हरभरा पाण्यात भिजून भुईसपाट झाला असून मिरची, कलिंगड, फ्लॉवर, काकडी यांसारख्या भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडांवरील कच्च्या कैऱ्या गळून पडल्याने फळबागांचेही मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी निवासी पत्राशेड व पोल्ट्री शेडचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
अगोदरच बाजारभाव नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसाने दुहेरी संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी अंकिता वाळुंज, अनिल वाळुंज, वैभव उंडे, संदीप पोखरकर, महेंद्र वाळुंज, सुमित वाळुंज, शिरीष रोडे , सतीश रोडे, निलेश पडवळ, मनोज रोडे, बाळासाहेब रोडे आदींनी केली आहे.

जाहिरात

error: Content is protected !!