नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे संचालक तथा माजी चेअरमन कैलास बाबुराव वाळुंज यांना संचालकपदासाठी अपात्र ठरवत त्यांचे संचालकपद रद्द करण्याचा आदेश सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख सहकारी संस्था, जुन्नर यांनी दिला आहे. याबाबत वडगाव आनंद येथील पियुष उत्तम देवकर यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये कैलास वाळुंज हे लाला अर्बन को-ऑप बँक, नारायणगाव येथील थकीत कर्जदार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ क-अ अंतर्गत त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती. सहाय्यक निबंधक कार्यालयाने संबंधितांना नोटीस बजावत अनेक वेळा सुनावणीची संधी दिली. तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर केले. त्यामध्ये बँकेकडून देण्यात आलेली स्थावर मालमत्ता ताबा नोटीस तसेच थकीत कर्जासंदर्भातील नोंदींचा समावेश होता. दुसरीकडे, संबंधित संचालकांकडून थकबाकीची पूर्तता झाल्याचे कोणतेही समाधानकारक पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे कैलास वाळुंज हे थकीत कर्जदार असल्याचे निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार त्यांचे संचालकपद आदेशाच्या दिनांकापासून समाप्त करण्यात आले आहे. तसेच त्यांची जागा रिक्त झाल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आळेफाटा परिसरातील सहकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून संबंधित पतसंस्थेच्या भविष्यातील कारभाराबाबत चर्चांना उधाण आले आहे. सहकार विभागाच्या या कारवाईकडे तालुक्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि सभासदांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या संदर्भात कैलास वाळुंज यांच्याशी भ्रमण धरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही. या निर्णयाच्या विरोधात मी वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार आहे.