नारायणगाव :
जुन्नर शहरातील सराईपेठ परिसरात गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा व्यावसायिकाची जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला जुन्नर पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत पाठलाग करून जेरबंद केले. ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दोन किलोमीटर पाठलाग करून नागरिकांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत झाली आहे.
याबाबत शैलेंद्र देविदास काजळे (सराफ व्यावसायिक) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवार (दि. २१ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास सराईपेठ, जुन्नर येथील त्यांच्या PNK ज्वेलर्स या दुकानात काळ्या रंगाच्या सुझुकी अॅक्सेस स्कूटीवरून एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने दुकानासमोर स्कूटी उभी करून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर जवळ असलेल्या बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सोन्याचे दागिने व ट्रे गोणीमध्ये भरून देण्याची धमकी दिली.
या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३१२ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ व २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी तातडीने पोलीस पथक रवाना करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी पथक रवाना केले. तपासादरम्यान आरोपी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिसून आला. पोलिसांनी त्याचा सुमारे दोन किलोमीटर पाठलाग केला. यावेळी नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आले. सदाशिव बाजीराव वारुळे (वय २६, रा. केडगाव, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, सहायक फौजदार गिजरे, पोलीस शिपाई दादा पावडे, गणेश शिंदे, विशाल चौधरी, बापू वाघमोडे, राहुल सुसलादे आणि योगेश काथवारे यांच्या पथकाने केली.
आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संकेत चौधरी करीत आहेत.