12 नोव्हेंबरला जुन्नर येथे ‘सह्याद्री वाचवा निर्धार परिषद’चे आयोजन.

नारायणगाव :
जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगा, पठार, जैवविविधता, जलस्रोत आणि स्थानिक जनतेच्या उपजीविकेवर संभाव्य परिणाम करणाऱ्या विविध विकास प्रकल्पांविरोधात जनजागृती व व्यापक लोकचळवळ उभी करण्यासाठी गुरुवार (दि. १2 नोव्हेंबर) रोजी जुन्नर येथे ‘सह्याद्री वाचवा निर्धार परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.

सह्याद्री वाचवा संघर्ष समिती, जुन्नर तालुका यांच्या वतीने सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत आदिवासी समाज प्रबोधिनी, जुन्नर येथे ही परिषद होणार आहे. पंप स्टोरेज प्रकल्पांच्या संभाव्य परिणामांबाबत जनतेमध्ये जागृती करणे, तसेच सह्याद्रीच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
या परिषदेला सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पालस्कर अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंप स्टोरेज प्रकल्प विषयातील अभ्यासक श्रीपाद धर्माधिकारी, के. जे. जॉर्ज, अनिल अवचट, डॉ. अमोल वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
जुन्नर तालुक्यातील माळशेज-भोरांडे (आंबेगाव) आणि माळशेज घाट (खुबी) येथील पंप स्टोरेज प्रकल्पांमुळे पर्यावरणीय परिणामांविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या पर्यावरणीय भवितव्याबाबत लोकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
विशेषतः जलविद्युत निर्मितीसाठी होणारे जलसाठे, बांधकामे, पाण्याचे स्रोत, डोंगररांगा, स्थानिक शेती, पर्यटन आणि आदिवासी व ग्रामीण समुदायांच्या उपजीविकेवर नेमके काय परिणाम होतील, याचे सखोल व पारदर्शक मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे संघर्ष समितीने म्हटले आहे.
विकासाच्या नावाखाली स्थानिक लोकांच्या नैसर्गिक संसाधनांवरील हक्कांकडे दुर्लक्ष होता कामा नये. प्रकल्पांचे पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम, पर्यायी पर्याय तसेच स्थानिक जनतेचे अधिकार यांची स्पष्ट माहिती जनतेसमोर मांडली गेली पाहिजे, अशी भूमिका समितीने घेतली आहे.
या परिषदेत प्रकल्पांचे आर्थिक स्वरूप, पर्यावरणीय व सामाजिक परिणाम, कायदेशीर तरतुदी, स्थानिक जनतेचे अधिकार आणि प्रकल्पांच्या विरोधात लोकशाही मार्गाने उभारावयाच्या व्यापक लोकचळवळीवर विचारमंथन होणार आहे.
सह्याद्री वाचविणे ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर आपल्या पाणी, जंगल, जमीन आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याची लढाई आहे. त्यामुळे ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रतिनिधी, शेतकरी, महिला, युवक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सह्याद्री वाचवा संघर्ष समितीचे किशोर लोखंडे, सोमेश्वर निकम, संजय साबळे व किशोर लांडे यांनी केले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!