बाजारभाव कोसळल्याने बल्लाळवाडीतील शेतकऱ्याने १४ एकर टोमॅटोची बाग उपटली!

नारायणगाव :

टोमॅटोचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादनासाठी केलेला खर्चही बाजारभावातून वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीला कंटाळून बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी सुधीर घोलप यांनी आपल्या कुटुंबाच्या १४ एकर क्षेत्रातील टोमॅटोची उभी बाग उपटून टाकण्यास सुरुवात केली आहे. टोमॅटोच्या घसरलेल्या दरामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. टोमॅटोचे बाजारभाव पुन्हा कधी वाढणार, असा सवाल आता उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

जुन्नर तालुक्यात सध्या संकरित टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र, बाजारात टोमॅटोला किलोमागे अवघे आठ ते दहा रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. टोमॅटोची लागवड, खते, औषधे, मजुरी, पाणी आणि इतर मशागतीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यात तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही वाढत असल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च भरून काढणे कठीण झाले आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी थांबवली असून काहींनी बागा उपटून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

१४ एकर बाग उपटण्यासाठी अडीच लाखांचा खर्च

बल्लाळवाडी येथील सुधीर घोलप यांनी आपल्या कुटुंबाच्या १४ एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, सध्याच्या बाजारभावात उत्पादन खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाल्याने त्यांनी संपूर्ण बाग काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. टोमॅटोची बाग उपटण्यासाठी मजुरांना एकरी १७ हजार रुपये द्यावे लागत आहेत. त्यानुसार १४ एकर क्षेत्रातील बाग उपटण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च येत आहे. एकीकडे पिकातून उत्पन्न मिळत नसताना दुसरीकडे बाग काढून टाकण्यासाठीही मोठी रक्कम खर्च करावी लागत असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.

एकरी साडेतीन लाखांचा खर्च; भांडवलही मिळेना

जुन्नर तालुक्यात टोमॅटोची एक एकर बाग उभी करण्यासाठी साधारण तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च येतो. पीक चांगले आले, तर बाजारभावातून हा खर्च वसूल होऊन नफा मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, यंदा कमी बाजारभावामुळे ही अपेक्षा फोल ठरत आहे. टोमॅटो तोडणीसाठी मजूर लावणे आणि माल बाजारात पोहोचविण्यासाठी वाहतूक करणे यासाठी खिशातून पैसे घालावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पीक ठेवायचे की काढून टाकायचे, असा पेच निर्माण झाला आहे.

दुष्काळ आणि बाजारभाव घसरणीचे दुहेरी संकट

यंदा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना एकाच वेळी अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला प्रतिकूल हवामान आणि पाण्याची कमतरता, तर दुसऱ्या बाजूला बाजारभावातील घसरण यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे. सणासुदीच्या काळात उत्पन्न मिळेल, अशी आशा असताना प्रत्यक्षात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. आगामी दिवाळी कशी साजरी करायची, मुलाबाळांसाठी कपडे कसे घ्यायचे आणि घरखर्च कसा भागवायचा, असे प्रश्न त्यांना सतावत आहेत.

दरवर्षी टोमॅटोची लागवड; यंदा मात्र निराशा

याबाबत सुधीर घोलप म्हणाले, “मी दरवर्षी टोमॅटोची लागवड करतो. आजपर्यंत माझ्या शेतात कांद्याची लागवड केलेली नाही. टोमॅटो पिकातून मला यापूर्वी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, सध्या बाजारभाव इतके घसरले आहेत की उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे हतबल होऊन टोमॅटोची बाग उपटून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला.”

टोमॅटोच्या बाजारभावाबाबत चुकीचे अंदाज व्यक्त करून शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात असल्याची टीकाही घोलप यांनी केली. काही कथित टोमॅटो अभ्यासक पैसे घेऊन शेतकऱ्यांना विशिष्ट प्रकारच्या लागवडीचा आग्रह करतात. अमुक पद्धतीने लागवड केल्यास चांगला बाजारभाव मिळेल, असे सांगितले जाते. त्यावर विश्वास ठेवून शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र, आवक वाढल्यानंतर बाजारभाव कोसळतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

इतर राज्यांतील आवक आणि दर्जानुसार दरात फरक

टोमॅटो व्यापारी सारंग घोलप म्हणाले की, इतर राज्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. तेथे दर्जेदार टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे. जुन्नर तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीसदृश परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे.

सध्या जुन्नर तालुक्यासह इतर भागांतून नारायणगाव बाजारपेठेत गावठी टोमॅटोची आवक होत असून, त्याला २० किलोच्या क्रेटमागे ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. मात्र, टोमॅटोचा प्रकार, दर्जा आणि बाजारातील मागणी यानुसार दरात फरक पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लागवडीपूर्वी पाण्याची उपलब्धता तपासा

उन्हाच्या तीव्रतेमुळे टोमॅटोच्या बागा कोमेजू लागल्या आहेत. त्यातच पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास आगामी काळात पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ बाजारभावाच्या अपेक्षेवर मोठ्या क्षेत्रात टोमॅटोची लागवड न करता पाण्याची उपलब्धता, उत्पादन खर्च, बाजारातील मागणी आणि संभाव्य आवक यांचा विचार करावा. उपलब्ध पाण्याचे नियोजन करूनच पुढील लागवडीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन सारंग घोलप यांनी केले.

टोमॅटोच्या घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांना उभ्या बागा उपटून टाकण्याची वेळ येत असेल, तर उत्पादन खर्च आणि बाजारातील दर यांच्यातील मोठी तफावत अधोरेखित होते. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी बाजारातील आवक, मागणी आणि दर याबाबत योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. अन्यथा दरवर्षी मोठ्या अपेक्षेने टोमॅटोची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अशाच आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!