नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात सहकारी विकास सोसायट्यांच्या प्रतिनिधी ठरावांची लगबग सुरू झाली आहे. आपल्या पसंतीच्या व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून ठराव व्हावा, यासाठी संभाव्य उमेदवारांकडून सोसायटी पदाधिकारी व सभासदांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे. जुन्नर तालुक्यात एकूण ७८ सहकारी विकास सोसायट्या असून, एका कृषक सहकारी सोसायटीसह ही संख्या ७९ आहे. यापैकी सुमारे ५५ सोसायट्या बँकेच्या थकबाकीदार असल्याची माहिती आहे. कर्जमाफीच्या अपेक्षेने अनेक सभासदांनी कर्जाची परतफेड न केल्याने काही सोसायट्यांना बँकेच्या संचालकाचा प्रतिनिधी म्हणून ठराव करता येत नसल्याने थकबाकी नसलेल्या सभासदाची प्रतिनिधी म्हणून निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १६ सप्टेंबरअखेर सहाय्यक निबंधक कार्यालय, जुन्नर येथे २९ विकास सोसायट्यांचे प्रतिनिधी ठराव, ‘क’ वर्गातील संस्थांचे १० ठराव आणि ‘ड’ वर्गातील संस्थांचे ७ ठराव प्राप्त झाले आहेत. मात्र, ‘ब’ वर्गातील संस्थेचा एकही प्रतिनिधी ठराव अद्याप प्राप्त झालेला नाही, अशी माहिती सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख यांनी दिली. दरम्यान, जुन्नर तालुक्यातून अ वर्ग गटातून पुन्हा जिल्हा बँकेची निवडणूक संजय काळे पुन्हा लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या विरोधात आमदार शरद सोनवणे किंवा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ‘अ’ वर्ग संस्थांमधून मतदान मिळवून देऊ शकणाऱ्या व्यक्तींचे प्रतिनिधी म्हणून ठराव व्हावेत, यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या संजय काळे यांच्या समर्थकांच्या बाजूने अधिक प्रतिनिधी ठराव होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. दरम्यान संजय काळे यांना शह देण्यासाठी आमदार शरद सोनवणे काय डाव खेळतात ❓ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संजय काळे यांचे राजकीय विरोधक रघुनाथ लेंडे निवडणूक लढविणार की स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून संजय काळे यांना पाठिंबा देणार ❓ याबाबतची देखील उत्सुकता वाढली असून त्यांची भूमिका देखील या निवडणुकीत महत्त्वाचे ठरू शकते.