बदलीनंतरही अधिकारी-कर्मचारी जुन्याच ठिकाणी .

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतरही काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बदली झालेले अधिकारी व कर्मचारी अद्याप त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बदली आदेशांची अंमलबजावणी नेमकी कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता यावी, तसेच पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद वाढावा, यासाठी वेळोळोवेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार करण्यात येतात. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून बदलीचे आदेश काढल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या नवीन ठिकाणी निर्धारित वेळेत रुजू होणे अपेक्षित असते. मात्र, काही ठिकाणी बदली आदेश होऊनही संबंधित अधिकारी व कर्मचारी जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्याच्या किंवा कर्मचाऱ्याच्या जागी नवीन व्यक्ती अद्याप रुजू झालेली नसल्याचे कारण काही संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रमुख देत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बदली झालेल्या कर्मचाऱ्याला जुन्या ठिकाणाहून कार्यमुक्त करण्यात आलेले नसल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. परिणामी, पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या बदली आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात विलंबाने होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यासंदर्भात जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी सांगितले की, “बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.” त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी कधी रुजू होतात, याकडे लक्ष लागले आहे. बदली प्रक्रिया ही पोलीस दलातील प्रशासकीय कामकाजाचा महत्त्वाचा भाग आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, बदली आणि कार्यमुक्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास पोलीस ठाण्यांच्या कामकाजात सुसूत्रता निर्माण होण्यास मदत होते. तसेच नागरिकांना प्रभावी व पारदर्शक पोलीस सेवा देण्यासाठीही या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे बदलीचे आदेश झाल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू करण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान या संदर्भात नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागेवर पर्यायी अधिकारी व कर्मचारी रुजू झाल्यावर तात्काळ बदलीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल. जुन्नरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड म्हणाले की, आमच्या पोलीस ठाण्यातील बदली झालेले काही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होणे बाकी आहे. त्यांच्या जागेवर पर्यायी कर्मचारी रुजू झाल्यावर बदली झालेले कर्मचारी बदलीच्या ठिकाणी पाठवण्यात येतील. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठवण्यात आले असून ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही गणपती उत्सव झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रवाना करण्यात येईल.

जाहिरात

error: Content is protected !!