नारायणगाव ग्रामसभेत विविध विकासकामांवर चर्चा. शासकीय जागेवरील अतिक्रमणे हटविण्यासह सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय. पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा.

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

नारायणगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा येथील मुक्ताबाई समाज मंदिरात उपसरपंच योगेश पाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेत शासकीय जागेवरील अतिक्रमणे हटविणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, ग्रामपंचायत मालकीच्या गाळ्यांची भाडेवाढ न करणे, तसेच गॅस शवदाहिनीमध्ये अंत्यविधीसाठी किमान एक हजार रुपये शुल्क आकारणे, आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ग्रामसभेच्या सुरुवातीला कनिका खैरे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत आरोप केल्याने काही काळ वाद निर्माण झाला. यावेळी उप पोलीस निरीक्षक जगदेव पाटील यांनी ग्रामसभेत वैयक्तिक विषय न घेता सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. त्यानंतर वाद शांत झाला. सभेत पूर्व वेस येथील महापुरुषांचे पुतळे, फास्ट फूड व हॉटेलमध्ये वापरले जाणारे हानिकारक पदार्थ, मैला गाळ प्रकल्प, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, विविध विकासकामे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई, गाळा जागाभाडे, शासकीय जागेवरील अतिक्रमणे, विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड आणि दलितवस्ती सुधार योजना आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे यांच्या सूचनेनुसार तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी किशोर खैरे, उपाध्यक्षपदी सागर दरंदाळे , तर सचिवपदी ॲड. राजेंद्र कोल्हे यांची निवड करण्यात आली. ग्रामस्थांच्या विविध मागण्या शेतीशिवारातील रस्त्यांची व बंदिस्त गटारांची दुरुस्ती करावी, घनकचरा व सांडपाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प राबवावा, गावठाणातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करावी, रुग्णालयातील जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, पडझड झालेल्या जुन्या घरकुलांच्या जागी नवीन घरकुले उभारावीत, खोडद रस्त्यावर पथदिवे बसवावेत आणि क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या. ग्रामसभेतील प्रश्नांना उत्तर देताना अध्यक्ष योगेश पाटे म्हणाले, “नारायणगाव परिसरातील रस्त्यांची कामे केली जातील. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह आवश्यक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात येतील. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती तसेच ग्रामस्थांनी सुचविलेली विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.” ग्रामसभेस सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, जिल्हा परिषद सदस्या नेहा पाटे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष खैरे, अशोक पाटे, संतोष वाजगे, सुषमा वाव्हळ, आशिष माळवदकर, अक्षय खैरे,अजित वाजगे, नामदेव खैरे, कनिका खैरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत सचिव म्हणून मच्छिंद्र जगताप यांनी काम पाहिले. राजश्री बोरकर, संतोष खैरे, सुजित खैरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. सूत्रसंचालन हेमंत कोल्हे यांनी केले.

जाहिरात

error: Content is protected !!