नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची १५०१ वी जयंती अर्थात ईद-ए-मिलाद नारायणगाव येथे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपत मुस्लिम बांधवांनी डीजे न लावता पैगंबर साहेबांच्या स्तुतीगीतांसह घोषणाबाजी करत जुलूस काढला. या जुलूसला सर्वधर्मीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मुस्लिम बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जुलूस मार्गावर सर्वधर्मीय नागरिकांनी गुलाबपुष्प व प्रसाद देऊन स्वागत केले, तर नारायणगाव पोलिसांच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले. त्यामुळे जुलूसमधून सामाजिक सलोखा व बंधुभावाचा संदेश देण्यात आला.
सुन्नी जामे मस्जिद येथून मुफ्ती मुनाजीर हुसेन व मुस्लिम जमातचे अध्यक्ष एजाज आतार यांच्या मार्गदर्शनाखाली जुलूसला सुरुवात झाली. बाजारपेठ, छत्रपती शिवाजी चौक, हनुमान चौक, जुन्नर रोड, बसस्थानक व भाजी बाजार मार्गे जुलूस पुन्हा सुन्नी जामा मस्जिद, मुस्लिम मोहल्ला येथे पोहोचला. तेथे जुलूसची सांगता करण्यात आली.
मुफ्ती मुनाजीर हुसेन, हाफिज शहबाज रजा, हाफिज ताहीर मणियार व मौलाना सद्दाम यांच्या मार्गदर्शनाखाली मदरसा अरबीया गुलशने मदिना आणि मदरसतुल मदिना गौसूल आझमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पैगंबर साहेबांच्या मानवतावादी, शांतता व सद्भावनेच्या संदेशावर आधारित घोषणा दिल्या. आकर्षक वेशभूषेमुळे विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. हजरत टिपू सुलतान लायन्स क्लबच्या युवकांनी तयार केलेली ‘मस्जिद-ए-नबवी, मदिना मुनव्वरा’ची प्रतिकृतीही जुलूसचे विशेष आकर्षण ठरली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख व उपसरपंच बाबू पाटे, सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे, युवा नेते सुरज वाजगे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, जुबेर आतार, संतोष दांगट, गणेश पाटे, संतोष पाटे, बाळा वाव्हळ यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.
नारायणगाव पोलिस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे, पोलिस उपनिरीक्षक जगदीश पाटील व दत्ता ढेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमास मुस्लिम जमातचे अध्यक्ष एजाज आतार, विश्वस्त मेहबूब काझी, अली इनामदार, रशिद इनामदार, हाजी नूरमोहम्मद मणियार, गफुर तांबोळी, सलीम मणियार, युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अशफाक पटेल, जावेद पटेल, सकलेन आतार, सलमान आतार, समीर इनामदार, रज्जाक काझी, रियाज मणियार, जुबेर शेख, निसार तांबोळी, मुनीर मोमीन, फारुक मोमीन, एजाज चौधरी, आजिम शेख, शहेबाज आतार यांच्यासह सुन्नी जामे मस्जिदचे पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईद-ए-मिलादनिमित्त आयोजित कार्यक्रमांची सुरुवात पहाटे पाच वाजता सलाम पठणाने झाली. त्यानंतर सामूहिक कुरआन पठण व मिठाई वाटप करण्यात आले. मदरसा अरबीया गुलशने मदिनामधील कुरआन अध्ययन पूर्ण केलेल्या १३ विद्यार्थ्यांना ‘तकमिल-ए-कुरआन’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच आयोजित क्विझ स्पर्धेत ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पैगंबर जयंतीनिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मजलिस व दरुदखानी, महिलांसाठी इज्तेमा, मिलाद पठण, विद्यार्थ्यांचे धार्मिक कार्यक्रम, मिठाई, खीर व शरबत वाटप, सर्वधर्मीयांसाठी आरोग्य शिबिर यांचा समावेश होता. जुलूसच्या समारोपानंतर लंगर-ए-मुस्तफाचे आयोजन करण्यात आले.
मुस्लिम जमात नारायणगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांचे सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, उपसरपंच योगेश बाबू पाटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे, युवा नेते सुरज वाजगे यांच्यासह ग्रामस्थांनी कौतुक केले.