नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
गाजर गवताच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेती, पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन १६ ते २२ ऑगस्टदरम्यान गाजर गवत निर्मूलन सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त कांदळी-वडामथा येथे गाजर गवत निर्मूलन कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसरातील गाजर गवताचे निर्मूलन केले.
या वेळी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे-२) येथील शास्त्रज्ञ डॉ. राहुल घाडगे, कृषी विस्तार विषयतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, पीक संरक्षण विषयतज्ज्ञ तसेच प्रक्षेत्र व्यवस्थापक वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. राहुल घाडगे यांनी सांगितले की, गाजर गवत हे अत्यंत आक्रमक तण असून शेतीचे बांध, रस्त्यांच्या कडेला, पडीक जमिनी तसेच सार्वजनिक ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो. गाजर गवतामुळे पिकांशी अन्नद्रव्ये, पाणी आणि जागेसाठी स्पर्धा निर्माण होऊन उत्पादनावर परिणाम होतो. त्याच्या परागकणांमुळे त्वचेची आग, खाज, अॅलर्जी तसेच श्वसनासंबंधी त्रास होण्याची शक्यता असते.
गाजर गवताचे नियंत्रण करण्यासाठी फुलोरा येण्यापूर्वी ते उपटून नष्ट करणे, परिसराची नियमित पाहणी करणे आणि त्याचा बीजप्रसार रोखणे आवश्यक आहे. गाजर गवत निर्मूलन ही केवळ एका व्यक्तीची जबाबदारी नसून गावातील शेतकरी व नागरिकांनी सामूहिकरीत्या प्रयत्न केल्यास त्याचा प्रादुर्भाव प्रभावीपणे कमी करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. दत्तात्रय गावडे यांनी गाजर गवताच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत माहिती देताना यांत्रिक, जैविक तसेच आवश्यकतेनुसार शिफारशीनुसार रासायनिक नियंत्रण पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन केले. गाजर गवत उपटताना हातमोजे, मुखपट्टी यांसारख्या संरक्षणात्मक साधनांचा वापर करावा. फुलोऱ्यात किंवा बीजधारणेच्या अवस्थेतील गाजर गवत शेतात टाकू नये, तर योग्य पद्धतीने नष्ट करावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत गाजर गवत उपटून परिसर स्वच्छ केला. या उपक्रमामुळे परिसरातील गाजर गवताचा प्रादुर्भाव कमी करण्याबरोबरच त्याच्या पुढील प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
या कार्यक्रमास दीपक गोपाळे, जालिंदर घाडगे, तानाजी रेपाळे, गोविंद गोपाळे, नामदेव गोपाळे, गणेश घाडगे, सचिन घाडगे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
गाजर गवत निर्मूलन सप्ताहाच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करून ‘गाजर गवत मुक्त परिसर – निरोगी पर्यावरण आणि सुरक्षित शेती’ हा संदेश देण्यात येत आहे. गाजर गवताचे कायमस्वरूपी नियंत्रण करण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संस्थांनी एकत्रितपणे नियमित प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, नारायणगावचे शास्त्रज्ञ डॉ. राहुल घाडगे यांनी केले.