नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
महाराष्ट्रातील आधुनिक व व्यावसायिक फलोत्पादन तंत्रज्ञान आणि जम्मू-काश्मीरमधील समशीतोष्ण फळपिकांचे प्रगत तंत्रज्ञान यांची परस्पर देवाणघेवाण करून दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे-II) चे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी ग्रामोन्नती मंडळाच्या विश्वस्त मोनिका मेहेर आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. राहुल घाडगे यांच्यासह शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ (SKUAST-K), श्रीनगर येथे भेट दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नजीर अहमद गनाई, विविध विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फलोत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञान देवाणघेवाणीबाबत सविस्तर चर्चा झाली. कृषिरत्न अनिल मेहेर यांनी महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनातील दीर्घ अनुभवाच्या आधारे वैज्ञानिक द्राक्ष उत्पादन, Y-ट्रेनिंग पद्धत, कॅनोपी व्यवस्थापन, उच्च घनता लागवड, मृदा व पान ऊतक परीक्षण, सेंद्रिय कर्ब वाढ, जैवखते, जैविक कीडनाशके, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, GAP आधारित उत्पादन, ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन याबाबत माहिती दिली. याशिवाय संरक्षित शेती, काढणीपश्चात तंत्रज्ञान, पॅकहाऊस, कोल्डचेन, मूल्यवर्धन, ब्रँडिंग आणि बाजारपेठ जोडणी या आधुनिक तंत्रज्ञानाचा जम्मू-काश्मीरमधील फलोत्पादन क्षेत्रात अवलंब करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, चेरी आणि इतर समशीतोष्ण फळपिकांचे उत्पादन तंत्रज्ञान व ज्ञान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या संधींचाही आढावा घेण्यात आला. हवामानानुसार विविध फळपिकांच्या लागवडीत येणाऱ्या अडचणी, आधुनिक उत्पादन पद्धती आणि बाजारपेठेतील संधी यावरही विचारविनिमय करण्यात आला. या संभाव्य सहकार्यामुळे संयुक्त प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच संशोधन व विस्तार सेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रातील व्यावसायिक फलोत्पादनाचा अनुभव आणि जम्मू-काश्मीरमधील समशीतोष्ण फळपिकांचे ज्ञान यांची सांगड घातल्यास दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ज्ञानाच्या सेतूने महाराष्ट्र-काश्मीर जोडणार “महाराष्ट्रातील द्राक्षबागा आणि काश्मीरच्या फळबागांना ज्ञानाच्या सेतूने जोडत शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी नवी भागीदारी उभारण्याचा हा प्रयत्न आहे.” — कृषिरत्न अनिल मेहेर.