(सुरेश वाणी ) नारायणगाव :
शिक्षण विभागाच्या नियोजनाचा अभाव आणि नवीन पुरवठादार ठेकेदाराच्या निवडीला झालेल्या विलंबाचा फटका जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहारासाठी आवश्यक असलेला तांदूळ, डाळी आणि अन्य धान्यसाठा वेळेत उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे पोषण आहार योजना विस्कळीत होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील शैक्षणिक वर्षातील शिल्लक तांदळाचा साठा जून महिन्यात कसाबसा शाळांना उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, हा साठा आता संपुष्टात आला आहे. नवीन पुरवठा अद्याप सुरळीत न झाल्याने काही शाळांतील शिक्षकांना स्थानिक किराणा दुकानदार किंवा रेशन दुकानातून धान्याची तात्पुरती व्यवस्था करावी लागत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितली. कुठे तांदूळ नाही, तर कुठे डाळींचा तुटवडा तालुक्यातील अनेक शाळांमध्ये पोषण आहारासाठी लागणाऱ्या साहित्याचा अपुरा साठा असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तेल उपलब्ध आहे, मात्र तांदूळ नाही. काही शाळांमध्ये हळद व मीठ उपलब्ध असले तरी तूरडाळ, मूगडाळ किंवा वाटाणा यांचा साठा संपला आहे. त्यामुळे उपलब्ध साहित्याच्या आधारे विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे. शासनाकडून नवीन पुरवठादारांची निवड, करार प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने पुणे जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा परिणाम जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शाळांवरही झाला आहे. शैक्षणिक कामकाजासोबत धान्याची जुळवाजुळव शिक्षकांना अध्यापनासह विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची जबाबदारी पार पाडावी लागते. मात्र, आवश्यक धान्यसाठा उपलब्ध नसल्याने त्यांना स्थानिक पातळीवर धान्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक कामकाजावरही अतिरिक्त ताण येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शाळांमध्ये नियमित पोषण आहार मिळणे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे पुरवठादार निवडीतील विलंबाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून सर्व शाळांमध्ये पुरेसा धान्यसाठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालक आणि शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. वेळेत पुरवठा न झाल्यास योजना ठप्प होण्याची भीती शाळांमध्ये उपलब्ध असलेला साठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने आगामी काळात धान्याचा पुरवठा वेळेत झाला नाही, तर शालेय पोषण आहार योजना प्रत्यक्षात बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना नियमित आणि सकस आहार मिळण्यासाठी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान शाळांना जो पोषण आहार पुरवठा केला जातो त्याचे वजन कागदावर वेगळे लिहिले असते व प्रत्यक्षात मात्र वजन कमी भरते.ज्या ठेकेदारा मार्फत पुरवला जातो उपोषण आहार मोजून घ्यावा अशा सूचनासंबंधीत शाळांना असतात परंतु धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या वाहनात वजन काटाच नसतो त्यामुळे हे धान्य मोजून कसे घ्यायचे असा प्रश्न शिक्षकांना पडत आहे. शाळांना धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या वाहनांमध्ये वजन काटा उपलब्ध करून द्यावा अशी देखील मागणी शिक्षक वर्गांकडून केली जात आहे. दरम्यान पोषण आहाराच्या नियंत्रणासाठी प्रत्येक तालुक्याला तालुक्याला शालेय पोषण आहार अधीक्षक पद आहे परंतु जुन्नर तालुक्यामध्ये हे पद रिक्त असून सदरचा चार्ज विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे यांच्याकडे आहे दरम्यान जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांना याविषयी विचारणा केली असता ते म्हणाले, पोषण आहाराचा तुटवडा होता परंतु आता पोषण आला असून संबंधित शाळांना पुरवठा करण्याचे काम सुरू झाले आहे. पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला त्याच्या गाडीमध्ये वजन काटा ठेवण्याच्या सूचना देण्यात येतील.