नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ प्रस्तावित जुन्या मार्गानेच व्हावा, यासाठी जगातील १९ देशांमधील रेडिओ शांतता क्षेत्राच्या परिसरात सुरू असलेल्या प्रवासी तसेच मालवाहतूक रेल्वेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा वापर करता येईल का, याबाबत जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दिले. याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणीही डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधानांकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांबाबत पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. बिबट्यांचा प्रश्न पंतप्रधानांच्या निदर्शनास जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांत बिबट्यांचा मानवी वस्त्यांमधील वावर वाढला असून, बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक ग्रामस्थ, विशेषतः लहान मुलांना जीव गमवावा लागल्याचे डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. बिबट्याचा समावेश अनुसूची एकमधून वगळून अनुसूची दोनमध्ये करण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी दिले. या गंभीर प्रश्नाची दखल घेत आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. इंद्रायणी मेडिसिटी हा महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प उभारण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी राज्याच्या विधानसभेत केली होती. मात्र, घोषणेला चार वर्षांचा कालावधी उलटूनही हा प्रकल्प अद्याप प्रलंबित असल्याचे डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. इंद्रायणी मेडिसिटीला गती देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. या विषयाची माहिती समजून घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील आदिवासीबहुल भागात, विशेषतः जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यांतील श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात दुर्मिळ औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळतात. या वनस्पतींचे जतन, संवर्धन आणि त्यावर संशोधन करण्यासाठी जुन्नर येथे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी केली. तत्कालीन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. या विषयात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. शिवनेरीच्या पायथ्याशी ‘शिवसंस्कार सृष्टी’ छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडाच्या पायथ्याशी ‘शिवसंस्कार सृष्टी’ उभारण्यासाठी गेल्या सहा-सात वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधानांना सांगितले. हा प्रकल्प साकारल्यास जुन्नरच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्याबरोबरच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील. तसेच देशातील नव्या पिढीसह परदेशी पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि विचार समजण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्योगांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्गाची मागणी तळेगाव, चाकण, रांजणगावसह विविध औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांना सध्या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. उद्योगांना मालवाहतुकीसाठी स्वस्त, जलद आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान गतीशक्ती योजनेंतर्गत उरण, तळेगाव, चाकण आणि संभाजीनगरला जोडणारा स्वतंत्र मालवाहतूक रेल्वेमार्ग उभारण्यात यावा, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी केली. या मार्गामुळे उद्योगांना थेट न्हावा शेवा बंदराशी जोडणी मिळून मालवाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रकल्प व प्रश्नांची माहिती आस्थेने समजून घेतली. या सर्व विषयांत जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याच्या मागणी बाबतही लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. @ फोटो खालील ओळ -खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व खासदारांचा नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न मांडले.