नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
पिंपळवंडी ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमितता, विविध प्रशासकीय तक्रारी आणि ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर सकारात्मक सांगता झाली. गेल्या पाच दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या मयूर काचळे यांनी प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आपले उपोषण स्थगित केले. माजी आमदार अतुल बेनके यांच्या मध्यस्थीने तसेच विजय कुऱ्हाडे यांच्या प्रयत्नांमुळे हा तोडगा निघाला.
पिंपळवंडी ग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात करण्यात आलेल्या विविध तक्रारींची दखल जुन्नर पंचायत समितीने घेतली असून, संबंधित प्रकरणांचा नियमानुसार निपटारा करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यानंतर जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रतीक चेन्नावार यांनी मयूर काचोळे यांच्या प्रमुख मागण्यांवर महिनाभराच्या आत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर काचोळे यांनी आपले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.
मयूर काचळे यांनी ग्रामपंचायतीच्या दप्तराची सखोल तपासणी करण्यात यावी, ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समितीकडे केलेल्या विविध तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, न्यायालयाने दिलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी, कचरा संकलन पेटी व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या खरेदीची चौकशी करण्यात यावी, ग्रामविकास अधिकारी गणेश आवटी यांची तात्काळ बदली करण्यात यावी तसेच वेळेत घरपट्टी न भरणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा प्रमुख मागण्या प्रशासनाकडे मांडल्या होत्या.
या मागण्यांच्या समर्थनार्थ मयूर काचोळे हे दिनांक १५ पासून पिंपळवंडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. त्यांच्या आंदोलनाला गावातील तरुणांसह अनेक ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. उपोषणस्थळी दररोज ग्रामस्थांची उपस्थिती दिसून येत होती.
उपोषण स्थगित करताना मयूर काचोळे म्हणाले, “मी केलेल्या मागण्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्यावर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रशासनावर विश्वास ठेवून मी माझे आमरण उपोषण सध्या स्थगित करीत आहे. दिलेल्या मुदतीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल.”
दरम्यान, माजी आमदार अतुल बेनके यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून समन्वय साधला, तर विजय कुऱ्हाडे यांनीही सातत्याने पाठपुरावा करत उपोषणाचा मार्ग संवादातून सोडविण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनामुळे अखेर पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शांततेत सांगता झाली असून, आता प्रशासन पुढील महिनाभरात दिलेल्या आश्वासनांची कितपत अंमलबजावणी करते, याकडे पिंपळवंडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.