FDA आणि पुणे ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; १३ जण अटकेत, २६ संशयितांची नावे तपासात, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त.

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून कार्यरत असलेल्या राज्यव्यापी दूध भेसळ रॅकेटचा अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत मोठा पर्दाफाश केला आहे. कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायने, स्किम मिल्क पावडर, खाद्यतेल, इमल्सिफायर, डिटर्जंटसह विविध साहित्याचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान २६ संशयित व्यक्तींची नावे समोर आली असून या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सुमारे ३० पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच FDA चे २० हून अधिक अधिकारी अशा ५० सदस्यीय पथकाने ही गुप्त मोहीम यशस्वीपणे राबवली.

कृत्रिम दूध तयार करण्यासाठी रसायनांचा वापर

तपासादरम्यान मुख्य आरोपी सुशांत बबनराव हिंगे (रा. मंचर) याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार स्किम मिल्क पावडरद्वारे दुधातील SNF वाढविणे, व्हे पावडरद्वारे प्रोटीनचे प्रमाण वाढविणे, खाद्यतेलाद्वारे फॅट वाढविणे तसेच इमल्सिफायर आणि डिटर्जंटच्या सहाय्याने मिश्रण तयार करून कृत्रिम दूध बनविले जात असल्याचे समोर आले आहे. हे मिश्रण विविध दूध संकलन केंद्रे, दूध व्यवसायिक आणि वितरकांमार्फत बाजारात पुरविले जात असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली.

विविध जिल्ह्यांत एकाच वेळी छापे

मंचरमधील धागेदोरे मिळाल्यानंतर पुणे, अकलूज (सोलापूर), राहुरी व अहिल्यानगर, सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर), भिवंडी, जळगाव तसेच इतर ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रसायने, दूध भेसळीसाठीचे साहित्य, नोंदी, आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले.

पिंपळगाव खडक येथील डेअरीवर कारवाई

तपासादरम्यान आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडक येथील एका डेअरीवर FDA अधिकाऱ्यांनी भेट दिली. तेथे दूध संकलन व विक्री व्यवसायाच्या आडून भेसळयुक्त दूध निर्मितीसाठी लागणाऱ्या पदार्थांचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याठिकाणी सुमारे २,७६७ किलो दूधसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे १ लाख ६४ हजार ७५५ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा साठा मानवी आरोग्यास धोकादायक असल्याने नष्ट करण्यात आला.

आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी

तपास यंत्रणांनी केवळ भौतिक साहित्यापुरती चौकशी न करता बँक व्यवहार, GST नोंदी, UPI व्यवहार, मोबाईल फोन, CCTV फुटेज, वाहतूक नोंदी, खरेदी-विक्री रजिस्टर आणि डिजिटल पुरावे यांचीही तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे या रॅकेटमधील आर्थिक साखळी, पुरवठादार, वितरक आणि लाभार्थी यांची संपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

तपासातील प्रमुख संशयित

या प्रकरणात सुशांत हिंगे (मंचर), हेमंत टेके (अकलूज), संदीप लोढा (मंचर), संजोग यादव (भिवंडी), चेतन भोर (जुन्नर), कैलास लाळगे (शिरूर), कुणाल कुलवडे (जुन्नर), शुभम गिरवले (अहिल्यानगर), सचिन संपकाळ (सिल्लोड), वैभव हांडे (जुन्नर), शुभम वाळुंज (मंचर), अजित करंडे (राहुरी), रोशन दरेकर (अवसरी), राजू सांडभोर (अवसरी), प्रमोद घोरपडे (राहुरी), प्रमोद कडू (राहुरी), बापूराव झगडे (दौंड), सोनू घोरपडे (पिलीव, सोलापूर), विठ्ठल जाधव (पाबळ), अभिजित काटे (उरुळीकांचन), अभिजित शेंडकर (माहीजळगाव), आकाश सावंत (जुन्नर), सतीश केंजळे (पाबळ), मनोहर ढमाले (कडूस), ठकसेन आरगडे (पिंपळगाव) आणि राजेश तांबडे (अवसरी खुर्द) यांची नावे तपासात समोर आली आहेत.

आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई

अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि संबंधित नियमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेटविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे FDA आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तपास पुढे सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(बॉक्स)

तपासातील महत्त्वाचे मुद्दे

  • मंचर हे दूध भेसळ रॅकेटचे मुख्य केंद्र असल्याचा संशय
  • ५० सदस्यीय संयुक्त पथकाची कारवाई
  • १३ आरोपी अटकेत
  • २६ संशयितांची नावे तपासात
  • अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
  • अनेक जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापेमारी
  • रसायनांच्या साहाय्याने कृत्रिम दूध तयार केल्याचा आरोप
  • आर्थिक व्यवहार व डिजिटल पुराव्यांची सखोल चौकशी सुरू.

जाहिरात

error: Content is protected !!