नारायणगाव : विघ्नहर्ता टाइम्स वृत्तसेवा
जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांबे (ता. जुन्नर) येथे गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्यावर पोलिसांनी कारवाई करून सुमारे १ किलो ९०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
दिनांक १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.४० वाजण्याच्या सुमारास तांबे येथील मुरलीधर धोंडु जोशी यांच्या घराशेजारी असलेल्या शेतामध्ये हिरव्या रंगाच्या नेटच्या आडोशाला अंमली पदार्थ असलेल्या गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गांजाची झाडे आढळून आली.
या कारवाईदरम्यान एकूण १ किलो ९०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मुरलीधर धोंडु जोशी (रा. तांबे, आंबेदरा वाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम २० (ब) (ii) (अ) व ८ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गिजरे, हवालदार महेश भालेराव, पोलीस शिपाई दादा पावडे, अमोल सातपुते, कैलास केंद्रे, श्रीराम शिंदे व दीपक वणवे यांच्या पथकाने केली.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जुन्नर तालुक्यात अंमली पदार्थांच्या लागवड, साठवणूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.