नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
पुणे-नाशिक महामार्गावरील कोठारी मारुती शोरूमसमोर रविवारी सायंकाळच्या सुमारास तीन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात गोळेगाव (ता. जुन्नर) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीसह इतर सात जण जखमी झाले. हा अपघात सायंकाळी सातच्या सुमारास मुसळधार पावसात घडला. जखमींवर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली. या अपघातात संजय लिंबाजी खंडागळे (वय २५, रा.गोळेगाव (ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला. तर त्याची कीर्ती संजय खंडागळे (वय १९, रा. गोळेगाव) यांच्यासह अन्य सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अझरुद्दीन काझी (चालक), माया नामदेव कदम (वय ५८), ऋषिकेश नामदेव कदम (वय ३०), नामदेव भिवाजी कदम (वय ५९), ऋतिका नामदेव कदम (वय २८) आणि रुचिका ऋषिकेश कदम (वय २७) यांचा समावेश असून सर्वजण डीएसपी चौक, अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय खंडागळे हे पत्नीसह मोटारीने नारायणगावहून मंचरच्या दिशेने जात होते. दरम्यान, मुसळधार पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन प्रथम दुभाजकाला धडकले. त्यानंतर मोटार विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली आणि पुण्याकडून नारायणगावच्या दिशेने येणाऱ्या दोन वाहनांना जोरदार धडकली. या अपघातात पुण्याहून अहिल्यानगरकडे निघालेल्या एका इर्टिगा कारमधील चालकासह एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच सेवानिवृत्त अभियंता हनुमंत भापकर यांनी मदतकार्य सुरू केले. त्यानंतर नारायणगाव पोलीस ठाण्याचे हवालदार मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके तसेच पोलीस पाटील सुशांत भुजबळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी नारायणगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान अपघातात मृत झालेला संजय खंडागळे हा पुणे येथे आयटी इंजिनियर म्हणून काम करत होता दोन दिवसापूर्वी सुट्टी म्हणून गावी आला होता आणि आज चार वाजता घरून पुन्हा पुण्याला जात असताना पुणे नाशिक महामार्गावर मारुती शोरूम जवळ काळाने त्यांच्यावर झडप घातली.