नारायणगाव :विघ्नहर टाइम्स
जागतिक योग दिनानिमित्त नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने रविवारी (दि. २१) सकाळी योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नारायणगाव पोलीस स्टेशनसमोरील मैदानावर सकाळी ७ ते ८ या वेळेत हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
योग दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. यावेळी योगा प्रशिक्षक डॉ. नायकवडे यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या योगक्रियांचे प्रशिक्षण दिले. त्यांनी नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, मानसिक तणाव कमी होतो तसेच कार्यक्षमता आणि एकाग्रता वाढते, असे मार्गदर्शन केले.
पोलीस दलाचे काम अत्यंत जबाबदारीचे व तणावपूर्ण असल्याने अशा उपक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यास मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. योगाभ्यासादरम्यान सर्व उपस्थितांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून योग दिनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.