नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
कुकडी प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपळगाव जोगा धरणातून पुष्पावती नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग तात्काळ बंद करावा, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांनी कुकडी पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणांमधून पूर्व भागातील तालुक्यांसाठी सुरू असलेले पाण्याचे आवर्तन तात्काळ बंद करावे अशी देखील यावेळी मागणी करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की, यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून भविष्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पिंपळगाव जोगा धरणातील उपलब्ध पाणीसाठा जपणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सध्या धरणातून पुष्पावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने मौल्यवान पाण्याचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती, जनावरे व इतर आवश्यक गरजांसाठी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले, भगवान घोलप बबनराव तांबे, तानाजी तांबे, तानाजी बेनके,गणपत डुंबरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंपदा विभागाला दिलेल्या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर , रोहिदास कुटे, प्रमोद खांडगे, भूषणभाऊ आवटी यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय न झाल्यास संबंधित ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले म्हणाले की पिंपळगाव जोगा धरणामध्ये उपयुक्त साठा अजिबात नसून मृत्यूसाठी मधील पाणी उचलले जात आहे जर पाऊस उशिरा पडला तर या भागामध्ये पिण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहणार नाही. तानाजी तांबे म्हणाले की एक दिवसानंतर येडगाव धरणातून पूर्व भागातील तालुक्यांसाठी सुरू असलेले बंदला केल्यास येडगाव धरणात उड्या मारून आंदोलन केले जाईल. दरम्यान गणपत डुंबरे व त्यांच्या सहकार्याने देखील जनसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना देखील निवेदन देऊन पाणी वितरणाचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली कुकडी प्रकल्पामध्ये असलेल्या पाण्याची नियोजन योग्य प्रकारे करून पिण्यासाठी पाण्याचा साठा जतन करण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाचा असून जनतेने पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी केले. दरम्यान, कुकडी प्रकल्पातील घटता पाणीसाठा आणि उशिरा येणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.