नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या सन 2026 मध्ये होणाऱ्या 17 सदस्यीय निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. सहा प्रभागांतील 17 जागांपैकी नऊ जागा सर्वसाधारण गटासाठी, तीन जागा इतर मागास प्रवर्गासाठी, एक जागा अनुसूचित जातीसाठी तर चार जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.
अध्यासी निवडणूक अधिकारी तथा मंडल अधिकारी शितल गर्जे यांच्या उपस्थितीत वारूळवाडी ग्राममहसूल कार्यालयात झालेल्या सभेत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी वर्षा लांडे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, सरपंच विनायक भुजबळ, माजी सरपंच देवेंद्र बनकर, जंगल कोल्हे, सचिन वारुळे, जालिंदर कोल्हे, भाऊ वारुळे आदी उपस्थित होते.
यापूर्वी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार वारूळवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंचपद इतर मागास प्रवर्ग (महिला) यांच्यासाठी राखीव आहे.
महिलांसाठी असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार 17 पैकी 9 जागा महिलांसाठी तर 8 जागा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण गटातील नऊ जागांपैकी चार जागा महिलांसाठी, इतर मागास प्रवर्गातील तीनपैकी दोन जागा महिलांसाठी, अनुसूचित जमातीच्या चारपैकी दोन जागा महिलांसाठी तर अनुसूचित जातीची एकमेव जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
या आरक्षणाबाबत इच्छुकांना पुढील सात दिवसांत जुन्नर तहसील कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज दाखल करून हरकत नोंदविता येणार आहे.
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्र. 1 (3 जागा)
- सर्वसाधारण महिला – 1
- सर्वसाधारण – 1
- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – 1
प्रभाग क्र. 2 (3 जागा)
- अनुसूचित जाती महिला – 1
- सर्वसाधारण महिला – 1
- सर्वसाधारण – 1
प्रभाग क्र. 3 (3 जागा)
- अनुसूचित जमाती महिला – 1
- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – 1
- सर्वसाधारण – 1
प्रभाग क्र. 4 (2 जागा)
- अनुसूचित जमाती महिला – 1
- सर्वसाधारण महिला – 1
प्रभाग क्र. 5 (3 जागा)
- अनुसूचित जमाती – 1
- नागरिकांचा मागास प्रवर्ग – 1
- सर्वसाधारण – 1
प्रभाग क्र. 6 (3 जागा)
- अनुसूचित जमाती – 1
- सर्वसाधारण महिला – 1
- सर्वसाधारण – 1
आरक्षण जाहीर झाल्याने वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून तयारी सुरू झाली आहे.