कात्रज दूध संघातील कथित अनियमिततेची चौकशी; शासनाने दोन सदस्यीय समिती नियुक्त केली

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज दूध संघ) येथील कथित आर्थिक अनियमितता, संशयित बोगस दूध उत्पादक संस्था, नियमबाह्य सभासदत्व तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी दाखविण्यात आलेल्या 3000 लिटर दूध वितरण प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी दुग्धविकास विभागाने दोन सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे.

दुग्धविकास विभागाकडे प्राप्त झालेल्या विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), पुणे विभाग यांनी 11 जून 2026 रोजी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. समितीच्या अध्यक्षपदी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), पुणे श्रीकांत श्रीखंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून सदस्य म्हणून जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग-2 सहकारी संस्था (पदुम), पुणे अनंत चिंधू आधारी यांची निवड करण्यात आली आहे.

कात्रज दूध संघाच्या कामकाजाबाबत दाखल झालेल्या तक्रारींमध्ये अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेल्या किंवा निष्क्रिय संस्थांच्या नावावर दूध संकलन दाखवून आर्थिक व्यवहार केल्याचा संशय, दूध वाहतूक खर्चातील अनियमितता, प्राथमिक दूध उत्पादक संस्थांना सभासदत्व देताना उपविधींचे कथित उल्लंघन, वाढते कर्ज आणि ओव्हरड्राफ्ट तसेच जाहिरात व मार्केटिंग खर्चातील वाढ यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

तसेच पशुखाद्य कारखान्यातील खरेदी प्रक्रिया, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता आणि विविध प्रशासकीय निर्णयांची वैधता यांचीदेखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः धार्मिक कार्यक्रमासाठी 3000 लिटर दूध मोफत वितरित केल्याचे दाखविण्यात आलेल्या प्रकरणाकडे तक्रारदारांनी लक्ष वेधले आहे. या वितरणासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी, संचालक मंडळाचा ठराव तसेच नंतर घेण्यात आलेल्या कार्योत्तर मंजुरीचीही चौकशी होणार आहे.

याशिवाय सन 2021 ते 2025 या कालावधीत संघामध्ये सभासदत्व देण्यात आलेल्या काही प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या पात्रतेची, प्रत्यक्ष अस्तित्वाची, दूध संकलनाची आणि सभासदत्व मंजुरी प्रक्रियेची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सभासदत्वाचा संघाच्या निवडणूक प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला आहे का, याचाही तपास चौकशी समितीकडून केला जाण्याची शक्यता आहे.

शासनाने नियुक्त केलेली समिती संबंधित कागदपत्रे, दूध संकलन नोंदी, आर्थिक व्यवहार, लेखापरीक्षण अहवाल, सभासदत्व मंजुरी प्रक्रिया आणि अन्य अभिलेखांची तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

पुणे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या कात्रज दूध संघाच्या कामकाजावर या चौकशीचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असून, सहकार क्षेत्र, दुग्ध व्यवसाय आणि शेतकरी सभासदांचे लक्ष आता या चौकशी अहवालाकडे लागले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!