जुन्नर तालुक्यात सर्रास गुटखा विक्रीबंदी असतानाही खुलेआम विक्री; संबंधित विभागांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
राज्यात गुटखा निर्मिती व विक्रीवर बंदी असतानाही जुन्नर तालुक्यात अनेक गावांमध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच छोट्या व्यावसायिकांकडे सहजपणे गुटख्याच्या पुड्या उपलब्ध होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभाग व काही व्यावसायिक यांच्यामध्ये अर्थपूर्ण संबंध तर नाहीत ना? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
जुन्नर शहरासह ओझर, ओतूर, बनकर फाटा, ढोलवड, उंब्रज, खामुंडी, तेजेवाडी, शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, कुरण, वडज, पारुंडे, काळे, सुराळे, कुमशेत, आळेफाटा, राजुरी, बेल्हा, आणे, निमगाव सावा, मंगरूळ, साकोरी आदी गावांमध्ये गुटखा विक्री सर्रासपणे सुरू असल्याची चर्चा आहे. गावागावातील पानटपऱ्यांवर “सुगंधी तंबाखू”च्या नावाखाली गुटख्याची विक्री केली जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.
दरम्यान, एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाचा मोठा गुटखा होलसेल व्यवसाय असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. संबंधित नेत्याच्या दबावामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे जुन्नर तालुक्याचे माजी अध्यक्ष संतोष खैरे यांनी याबाबत तहसीलदार बाळासाहेब शिरसट तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांना लेखी निवेदन दिले आहे. तालुक्यात सुरू असलेले अवैध गुटखा विक्रीचे प्रकार तात्काळ बंद करावेत व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
शासन स्तरावर गुटखा विक्रीवर बंदी असली तरी प्रत्यक्षात तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अगदी छोट्या टपरीवरही गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे वास्तव आहे. जुन्नर येथील एका व्यक्तीकडून परिसरातील किराणा दुकानदार व पानटपरी चालकांना मोठ्या प्रमाणात गुटखा पुरवठा होत असल्याची चर्चा असून पोलिसांना याची माहिती असल्याचेही बोलले जात आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!