नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
जुन्नर तालुक्यातील पश्चिम घाट परिसरातील सडे पठारे पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध असून त्यांना जागतिक स्तरावरील अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पठारांचे संवर्धन करून आदिवासी भागाचा पर्यावरणीय व शाश्वत विकास साधण्यासाठी या सडे पठारांचा युनेस्कोच्या ग्लोबल जिओपार्कमध्ये समावेश करण्यासाठी आराखडा तयार करावा, अशी मागणी आमदार शरद सोनवणे यांनी वन विभागासह जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार सोनवणे यांनी पत्रात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्याला प्राचीन सातवाहनकालीन, ऐतिहासिक व पर्यावरणीय वारसा लाभला असून त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त होऊ शकते. युनेस्कोच्या ग्लोबल जिओपार्क कार्यक्रमांतर्गत जुन्नरमधील सडे पठारांचा समावेश झाल्यास या भागाला जागतिक दर्जाची ओळख मिळणार आहे. यामुळे सडे पठारांचे संवर्धन, पर्यटन विकास आणि स्थानिकांच्या आर्थिक समृद्धीला चालना मिळणार आहे.
सडे पठारांवरील गवताळ प्रदेश जलसंवर्धनाचे मोठे कार्य करत असून, या प्रदेशाच्या संवर्धनातून जलस्रोत टिकविण्यास मदत होणार आहे. तसेच गवताळ सफारी आणि पर्यावरण पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर जुन्नर वन विभागाच्या वतीने ‘जुन्नर तालुका सडे पठारे संवर्धन समिती’ स्थापन करण्यात आली असून, समितीमार्फत संवर्धन प्रकल्पाचा आराखडा तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार सोनवणे यांनी केली आहे.
‘सडे पठारे हे महाराष्ट्राचे नैसर्गिक वैभव’
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांनी सांगितले की, “सडे पठारे हे महाराष्ट्राचे खरे नैसर्गिक वैभव आहे. जुन्नर परिसरातील सडे पठारे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून येथे वनस्पतींच्या अनेक नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. हिवरे पठारावरील काही प्रजाती या ‘इन्डॅमिक’ म्हणजेच जगात फक्त त्याच परिसरात आढळणाऱ्या आहेत. या प्रजातींची नावेही हिवरे पठारावरून देण्यात आली आहेत. त्यामुळे या पठारांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. या पठारांना युनेस्कोच्या ग्लोबल जिओपार्कचा दर्जा मिळू शकतो आणि त्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत.”
वन विभागाचे प्रयत्न सुरू
उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितले की, “जुन्नर वन विभागातील पश्चिम घाट परिसर अत्यंत समृद्ध असून सडे पठारांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या संवर्धनासाठी अभ्यासक व तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. युनेस्कोच्या ग्लोबल जिओपार्कसाठी आराखडा तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून, यासाठी लोकप्रतिनिधींचे पाठबळ महत्त्वाचे ठरणार आहे.”