नारायणगाव बसस्थानकात प्रवाशांच्या गर्दीतून दागिन्यांची चोरी; १६ लाख ९४ हजारांचा ऐवज लंपास.


विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

नारायणगाव (ता. जुन्नर) – येथील बसस्थानकावर मंगळवारी (दि. २८ एप्रिल २०२६) दुपारच्या सुमारास प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून तब्बल १६ लाख ९४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली.
याबाबत मिरा गणपत शिंदे (वय ४८, रा. इंद्रधनुष्य अपार्टमेंट, नेरूळ, नवी मुंबई; मूळ रा. बोरी खुर्द साळवाडी, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी मिरा शिंदे या दुपारी सुमारे १२:१५ ते २:०० वाजण्याच्या दरम्यान नारायणगाव बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना ही घटना घडली. बसमध्ये चढण्यासाठी मोठी गर्दी असल्याने त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधील दागिने लंपास केले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे ६.३० लाख रुपये किंमतीची दोन मंगळसूत्रे (प्रत्येकी ४.५ तोळे), १.४० लाखांचे एक मंगळसूत्र (२ तोळे), १.४० लाखांची बोरमाळ, १.४० लाखांच्या दोन बांगड्या, २.२४ लाखांचा राणीहार, ३.५० लाखांच्या दोन अंगठ्या आणि ७० हजारांचे झुमके यांचा समावेश आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे बसस्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे आवाहन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी केले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!