नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
अहिनवे वाडी (ता. जुन्नर ) येथील गोंदेवाडी आदिवासी वस्तीत मारुती धर्मा जाधव यांच्या घराला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. मात्र, घरातील दोन ते अडीच वर्षांच्या चिमुरडीच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. आग लागल्याचे पाहून झोपेतून जागी झालेल्या चिमुरडीने तत्काळ घराबाहेर येत आरडाओरडा केला. तिच्या आवाजामुळे शेजारील नागरिक जागे झाले आणि घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीत घरातील कपडे, फ्रिज, साठवलेले धान्य, कपाट तसेच इतर जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या असून कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच गोंदेवाडीतील महिला, पुरुष व युवकांनी मदतकार्य केले. तसेच उल्हास डुंबरे यांनी माजी सरपंच सविता अहिनवे व माजी उपसरपंच स्वप्नील अहिनवे यांना कळवले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य सुरू केले. यासोबतच महावितरण कर्मचारी व कामगार तलाठी यांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
दरम्यान, या दुर्घटनेत बाधित कुटुंबाला शासन व लोकप्रतिनिधींनी भेट देऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.