नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
येडगाव (ता. जुन्नर) येथील १४ नंबर कांदळी परिसरातील शेतकरी विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले असून, याच्या निषेधार्थ माजी आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या नारायणगाव कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबाजी नेरकर, येडगावचे माजी उपसरपंच हर्षल गावडे, विकास सोसायटीचे अध्यक्ष राहुल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की, वीज वितरण कंपनीला वारंवार सूचना करूनही विजेचा पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच कमी दाबाने वीज मिळत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यावेळी बोलताना माजी आमदार अतुल बेनके म्हणाले की, वीज वितरण कंपनीला सर्वत्र दिवसा वीजपुरवठा करणे शक्य नसल्यास किमान रात्रीच्या वेळेत सिंगल फेज वीजपुरवठा करावा, तसेच दिवसा थ्री फेज वीज उपलब्ध करून द्यावी. या संदर्भात तातडीने उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, सहाय्यक अभियंता अनिल मृदंनगौडा यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी गौडा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच येडगाव, वडगाव आणि कांदळी परिसरातील विविध वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.