नारायणगाव | विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
पराग नागरी सहकारी पतसंस्थेने अल्पावधीत उल्लेखनीय यश संपादन केले असून, संचालक मंडळाच्या पारदर्शक व नियोजनबद्ध कारभारामुळे हे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले.
पराग नागरी सहकारी पतसंस्थेच्या नारायणगाव शाखेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते आज (दि. २०) उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती निवृत्ती काळे, आंबेगाव पंचायत समितीचे सभापती कैलास काळे, पराग समूहाचे प्रमुख देवेंद्र शहा, जुन्नर औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास दरेकर, पराग पतसंस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बांगर, उपाध्यक्ष सचिन शहा, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार दिलीप वळसे पाटील म्हणाले की, देवेंद्र शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही पतसंस्था अल्पावधीत नावारूपाला आली आहे. भविष्यात ही संस्था नामांकित पतसंस्थांमध्ये गणली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाखा विस्तार करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, पुणे जिल्हा हा सहकाराचा बालेकिल्ला असून येथे हजारो पतसंस्था कार्यरत आहेत. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर, प्रशासकीय खर्चावर नियंत्रण आणि सभासदांच्या हिताचा विचार करणाऱ्या संस्थाच टिकून राहतील. ठेवीदार व कर्जदारांसाठी व्याजदर निश्चित करताना संचालक मंडळाने जबाबदारीने निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात माजी आमदार अतुल बेनके, देवेंद्र शहा, संजय काळे, अनिल मेहेर यांनीही मनोगते व्यक्त केली. देवेंद्र शहा यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की, मंचर येथे सुरू झालेल्या या संस्थेने अल्पावधीत मोठी भरारी घेतली असून संचालक मंडळाच्या कार्यक्षमतेमुळेच ही प्रगती साध्य झाली आहे.
अतुल बेनके यांनी नारायणगाव येथे सुरू झालेल्या शाखेमुळे स्थानिक व्यावसायिकांना कर्जसुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक निघोट व निलेश पडवळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाबाजी टेमगिरे यांनी मानले.