नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा – जुन्नर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि लो-व्होल्टेजच्या समस्येमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उभी पिके पाण्याअभावी जळत असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतीसाठी आवश्यक असलेला अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. दिवसाला सहा तास वीजपुरवठा दिल्यानंतर वारंवार फॉल्टच्या कारणास्तव दोन-दोन तास वीज खंडित केली जात असल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे अशक्य होत आहे. त्यामुळे भाजीपाला व इतर नगदी पिके धोक्यात आली आहेत.
शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून देणे, वीजपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करणे आणि अखंडित वीज देणे या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दलही शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बियाणे आणि खतांच्या वाढत्या किंमतींमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता वीज समस्येमुळे शेतीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
“शेतकरी जगला, तरच जग जगणार,” असे सांगत शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या विजेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.