नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा पुणे–नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर ट्रकच्या धडकेत सात मेंढ्या व काही कोकरे ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघातात दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या असून मेंढपाळ तुकाराम निंबारकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निंबारकर यांची शेती बाह्यवळण रस्त्याच्या पश्चिम बाजूस असून सध्या त्यांच्या शेतात कांदा काढणीचे काम सुरू आहे. कांदा काढणीनंतर उरलेल्या कांद्याच्या पातीवर चरण्यासाठी ते दुपारी मेंढ्या व शेळ्या घेऊन शेतात गेले होते. सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास परतत असताना भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याने मेंढ्या व शेळ्या घाबरून रस्त्याकडे पळाल्या. दरम्यान, आळेफाटा बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाला अंधारामुळे कळपाचा अंदाज आला नाही आणि ट्रकची जोरदार धडक बसली. या धडकेत सात मेंढ्या व काही कोकरे जागीच ठार झाली, यामुळे तुकाराम निंबाळकर यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या शेतकऱ्याची आहे. एवढे मोठे नुकसान झाल्यामुळे तुकाराम निंबारकर यांना मानसिक धक्का बसला आहे. या रस्त्यावर असलेले पथदिवे बंद असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या बाह्यवळण रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याबाबत आठ दिवसांपूर्वीच बाजार समितीचे माजी संचालक विपुल फुलसुंदर यांनी दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. वेळीच पथदिवे सुरू केले असते तर ही दुर्घटना टळली असती, अशी भावना निंबारकर यांनी व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.