विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा मढ -खिरेश्वर परिसरात सुरू असलेल्या बेकायदा माती उत्खननाच्या प्रकारावर अखेर महसूल प्रशासनाने कडक कारवाई करत एका वाहनाला मोठा दंड ठोठावला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. जुन्नर तालुक्यातील मढ खिरेश्वर परिसरात काही दिवसांपासून बेकायदा पद्धतीने मातीचे उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे सातत्याने येत होत्या. या उत्खननामुळे पर्यावरणीय हानी होत असल्यासोबतच शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याचे निदर्शनास आले होते. स्थानिक नागरिकांनीही याविरोधात आवाज उठवत तात्काळ कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जुन्नरचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांनी तातडीने पावले उचलत संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. संभाव्य विरोध लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. ओतूर येथील प्रथमेश राजेंद्र डुंबरे यांच्या मालकीच्या (एम एच 14 एम बी 22 77) वाहनावर कारवाई करण्यात आली.कारवाई दरम्यान बेकायदा मातीचे उत्खनन व वाहतूक करत असलेलेहे वाहन पकडण्यात आले. तपासणीत संबंधित वाहनाकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ वाहन जप्त करत त्यावर २ लाख ४3 हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई महसूल विभागाच्या पथकाने काटेकोरपणे पार पाडली. तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांनी सांगितले की, “तालुक्यात कुठेही बेकायदा उत्खनन सहन केले जाणार नाही. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी, जेणेकरून तात्काळ कारवाई करता येईल.” या कारवाईनंतर बेकायदा उत्खनन करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून प्रशासनाने पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. तसेच परिसरातील नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.