डीजेचा आवाज कमी होणार का?

नारायणगाव विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा जुन्नर तालुक्यात सध्या विविध गावांमध्ये यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू असून धार्मिक उत्साहात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका काढल्या जात आहेत. मात्र या मिरवणुकांमध्ये डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले असल्याची तक्रार पुढे येत आहे. कानठळ्या बसवणारा आवाज लोकांच्या मुळावर उठणार आहे.
काठीची मिरवणूक तसेच मांडवडाळ्याच्या मिरवणुकांदरम्यान डीजेचा मोठ्या आवाजात वापर केला जातो. या प्रचंड ध्वनीप्रदूषणाचा लहान मुले, वयोवृद्ध नागरिक तसेच आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या डीजेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, डीजे मालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे डीजे मालक आणि संबंधित यंत्रणा यांच्यात काही अर्थपूर्ण संबंध आहेत का, अशी चर्चा आता जनतेमध्ये रंगू लागली आहे.
ध्वनीप्रदूषण नियंत्रणाबाबत सर्वोच्च न्यायालय तसेच शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे, नियमांचे काटेकोर पालन करावे आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!