बिबट्या पकडायला पिंजरा लावलाय : भक्षच ठेवलं नाही .पिंजराही झाकला नाही. बिबट्या जेरबंद कसा होणार ❓

विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव तर्फे आळे येथील परिसरामध्ये बिबट्याचा उपद्रव वाढल्याने छबुराव उंडे यांच्या शेताजवळ दहा दिवसापूर्वी वनखात्याने पिंजरा लावलेला आहे. परंतु हा पिंजरा पूर्णपणे सताड उघडा आहे व त्यात भक्षाचाही तपास नसल्याने बिबट्या पिंजऱ्यामध्ये कसा येणार? वन खात्याचा दक्ष कारभार यामुळे चव्हाट्यावर येत आहे. पारगाव तर्फे आळे येथील छबुराव उंडे यांच्या शेतामध्ये मेंढरांचा वाडा होता. सलग दोन दिवस मेंढपाळाची मेंढरं बिबट्याने खाल्ल्याने वन खात्याने त्या ठिकाणी पिंजरा लावला होता. जोपर्यंत मेंढपाळाचा तेथे वाडा होता तोपर्यंत मेंढपाळाने या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला भक्ष म्हणून मेंढराचं कोकरू ठेवलं होतं. मेंढपाळाचा वाडा दुसरीकडे शिफ्ट झाल्यावर पिंजऱ्यातील कोकरू मेंढपाळ घेऊन गेला आणि पिंजरा मात्र भक्षा शिवाय उघडाच राहिला. वन खात्याच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी याकडे लक्षच दिले नाही. दरम्यान ज्यावेळेस वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला तेव्हा पिंजरा मागच्या बाजूने ज्या ठिकाणी बिबट्याला भक्ष ठेवतो ती संपूर्ण बाजू झाकून ठेवायला लागते, ल की जेणेकरून दर्शनी भागातून बिबट्याला फक्त आतमध्ये पिंजऱ्यात भक्ष दिसेल आणि ते खाद्य खाण्यासाठी बिबट्याच्या आत जाईल व जेरबंद होईल. यासंदर्भात ओतूरचे वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की,आमच्या कर्मचाऱ्याकडून चूक झालेली आहे. तातडीने ज्या ठिकाणी बिबट्याला भक्ष म्हणून बकरी अथवा कोंबडी ठेवली जाईल व तो पिंजरा झाकून ठेवला जाईल. ज्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल परिसरातील शेतकऱ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. दरम्यान पारगाव येथील युवक शेतकरी अनिकेत उंडे म्हणाला की, आमच्या भागामध्ये बिबट्यांची संख्या अधिक प्रमाणामध्ये आहे. शाळकरी मुलांना रस्त्याने ये-जा करताना अनेक वेळा बिबटे देखील दिसतात शिवाय शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांना बिबट्यांची भीती असते वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा याबाबतची माहिती देऊन देखील वन खात्याचे कर्मचारी म्हणावे असे लक्ष देत नाही आणि कधी पिंजरा लावला तर पुन्हा तिकडे फिरकत देखील नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

जाहिरात

error: Content is protected !!