विघ्नहर टाइम्स फक्त सेवा – नारायणगाव पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व भारतीय जनता पक्ष,काँग्रेस या क्रमाने पक्षीय बलाबल आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्येक गटात व गणात इच्छुक उमेदवारांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे काही राजकीय पक्षाकडे उमेदवार नसल्यामुळे दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्याकडे घेण्यासाठी काही डावपेच देखील आखले जात आहेत. जुन्नर नगर परिषदेमध्ये शिवसेनेची सरसी झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आपल्याला सोपी जाईल अशी अटकळ बांधीत असतानाच जुन्नर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडीवरून शिवसेनेचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यात झालेली “तू तू मैं मैं ” या निवडणुकीत काही प्रमाणात अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेने जुन्नर नगरपरिषद घेतलेली भरारी रोखण्याचा प्रयत्न दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कडून या निवडणुकीत केला जाण्याची दाट शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची दाट शक्यता असून अशा प्रकारे उमेदवारांना काम करण्याची मुभा देखील दिली आहे. दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमध्ये हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेचे अधिक गट मिळू शकतात तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागांवर समाधान मानावे लागू शकते. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार अमोल कोल्हे व जुन्नर चे माजी आमदार अखिल बेनके यांची पुण्यामध्ये या संदर्भात बैठक देखील झाली असून दोन दिवसांमध्ये या युतीच्या उमेदवारांची घोषणा होऊ शकते. आमदार शरद सोनवणे अपक्ष निवडून आले असले तरी त्यांनी तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष वाढवण्याची जोरदार मोहीम आखले असून जुन्नर नगर परिषदेमध्ये त्यांना चांगले यश आल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक देखील आपले अधिकचे उमेदवार निवडून येतील याबाबतची विवरचना आखली आहे. सावरगाव व राजुरी गटामध्ये एक महिन्यापासूनच प्रचार सुरू केला आहे. इतर सहा गटांमध्ये देखील सोप्या पद्धतीने काही इनकमिंग होईल का?याबाबतचे देखील डावपेच सुरू केले आहेत. दरम्यान जुन्नर नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून जे काही रामायण झालं शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यांच्यातच झालेला गदारोळ तसेच अंतर्गत बेबनाव यांचा फटका काही प्रमाणात शिवसेनेला बसू शकतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून देखील सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये उमेदवारांची चाचणी सुरू आहे शिवसेनेचे तालुकाप्रमुख यांच्या पत्नी एका जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक असून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इतर गटात देखील त्यांनी उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. या निवडणुकीत दोन शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढवायची का असा देखील प्रयत्न सुरू आहे परंतु दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबतची संमती मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे तसेच काही गटांमध्ये उमेदवारीवरून जुळणार नसल्याने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात सुद्धा विचारविनिमय सुरू आहे. जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची फारशी ताकद नाही. भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी जुन्नर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला असला तरी एकूण आठ गटांपैकी दोन गटात त्यांचं प्राबल्य चांगला आहे इतर गटात त्यांना उमेदवारांची देखील जुळवाजुळ करावे लागू शकते अथवा कोणाशी तरी युती अगर आघाडी करावी लागू शकते. भारतीय जनता पक्षाला जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन जागा मिळाल्यामुळे या पक्षाला काही प्रमाणामध्ये तरतरी आली. या पक्षाने सावरगाव गटात सांगली तयारी केली आहे तसेच डिंगोरे गटात देखील कार्यकर्त्यांनी जुळवा जुळवा चांगली चालवले आहे. येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना आमदार शरद सोनवणे यांनी चुचकारण्याचा प्रयत्न चालवला असून धनुष्यबाणावर लढण्याची गळ घातली जात आहे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे युवा नेते सत्यशील शेरकर यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढवले असल्याने तालुक्यात आता काँग्रेसची फारशी ताकद राहिली नाही. तथापि जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक नगरसेवक त्यांचा निवडून आला आहे. अर्थात निवडून आलेल्या नगरसेवकांनी देखील आमदार शरद सोनवणे यांच्या गटांमध्ये सहभागी होऊन काँग्रेसला हात दाखवला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे आठ गट असून सहा गटांमध्ये महिला उमेदवार आहेत तर अवघे दोन गट सर्वसाधारण आहेत. यातील सावरगाव गटामध्ये आशाताई बुचके यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला असून मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. अवघा पिंपळवंडी आळेघाटामध्ये एकच पुरुष उमेदवार जुन्नर तालुक्यातून जिल्हा परिषदेत निवडून जाऊ शकतो. या गटात देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते मंगेश काकडे यांना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर असल्याची चर्चा आहे. काकडे यांनी गेले दोन महिने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना झुलवत ठेवल्यामुळे सध्या काकडे यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली असून ऐनवेळी ते पाषाण या चिन्हावर या गटात उभे राहू शकतात. जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे माजी आमदार विरुद्ध माजी आमदार अशीच लढाई पाहायला मिळाली. अगदी तशीच लढाई जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमदार शरद सोनवणे विरुद्ध माजी आमदार अतुल बेनके असे पाहिला मिळणार आहे. जुन्नर नगर परिषदेच्या पहिल्याच मासिक बैठकीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यात आलेला कलगी तुरा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काही प्रमाणात शिवसेनेला अडचणीचा ठरू शकतो. या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकच्या जागा मिळवण्याची शक्यता आहे.