*विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा*
आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढणार असल्याचे माहिती मिळत आहे. तथापि अशा आघाडीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांच्या विरोध असल्याचे समजते.
आंबेगाव तालुक्यामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवावी असाही मतप्रवाह जरी असला तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते दोन शिवसेना व शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जाऊ अशा प्रकारचा प्लॅन सुरू असून जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या सोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर यांची एकत्रित बैठक झाली असून हा प्लॅन यावेळी फायनल झाला असल्याची चर्चा होत आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये देवदत्त निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी नको आहे. त्यामुळे त्यांचा आग्रह दोन्ही शिवसेना व शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस असा आहे. दोन शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढली. आणि ऐनवेळी शिवसेनेने (शिंदे) सेनेने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान होऊ शकते यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेस,उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस अशी एक वेळ आघाडी चालेल अथवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी चालू शकते असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील एका लोकप्रतिनिधीचे मत आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये दोन शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढले तर यामध्ये दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान होऊ शकते. यामुळे आंबेगाव तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आघाडी करायला वरिष्ठ नेत्यांची परवानगी मिळेल असे वाटत नाही.
दरम्यान अशा प्रकारच्या आघाडीला पक्ष नेतृत्वाने जर विरोध केला तर स्थानिक कार्यकर्त्यांनी पर्यायी शोधला आहे. शिवसेनेचे इच्छुक कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवून काही ठिकाणी तिकडून उमेदवारी घ्यायची. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून जे इच्छुक उमेदवार आहे त्यांना शिवसेनेत पाठवून तिकडून उमेदवारी घ्यायची. म्हणजे पक्षाच्या वरिष्ठांकडून कोणतीच कारवाई होणार नाही असाही पर्याय सध्या चर्चिला जात आहे.