नारायणगाव येथील पीर वस्तीजवळ वन खात्याने बिबट्या पकडला.


नारायणगाव : ( प्रतिनिधी)  नारायणगाव येथील साकारनगरी जवळ असलेल्या पिराच्या वस्तीजवळ वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या आज( दि. 17 ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेरबंद झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. दरम्यान या वस्तीत राहत असलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला करून त्याला मागील आठवड्यात जखमी केले. जखमी झालेल्या युवकाचे नाव तनिष नवनाथ परदेशी आहे. वन खात्याने पकडलेला बिबट्या नर असून त्याचे वय सुमारे चार ते पाच वर्षाच्या असून त्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. बिबट्या पकडण्यासाठी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र सुशांत भुजबळ, रेस्क्यू टीम सदस्य शंतनु डेरे, आदित्य डेरे, नंदू अडसरे, पप्पू भुमकर यांनी प्रयत्न केले.    पीरवस्ती जवळ राहत असलेला हा युवक गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घराजवळ फिरत असताना बिबट्याने मागच्या बाजूने येऊन त्याच्यावर हल्ला केला होता. बिबट्याच्या हल्ल्यात त्याच्या मांडील दोन ठिकाणी  जखमा झाले होत्या. त्यावेळी बिबट्याचा हल्ला झाल्यावर हा युवक बिबटयाच्या भीतीने 100 मीटर अंतरावर असलेल्या गाजर गवतात जाऊन लपून बसला होता.त्यावेळी त्याने आपल्या मित्राला फोन करून घटनेची माहिती सांगितली होती. त्या मित्राला परदेशी टिंगल करतोय असे वाटले होते. परंतु त्याचा रडण्याचा आवाज आल्याने मित्र तातडीने परदेशीच्या घरी आला व लगेच तनिषला फोन लावला व तू कुठे आहेस असे विचारल्यावर घराच्या बाजूला आंब्याजवळ असलेल्या गाजर गवतात मी लपून बसलोय असे त्याने सांगितले होते. गाजरगवतामधून त्यांनी मोबाईलची बॅटरी लावली. मोबाईलचा टॉर्च लावल्यावर त्याचा मित्र त्या गाजर गवतात गेला व त्याला बाहेर आणले. तो प्रचंड घाबरलेला होता त्याला तातडीने नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते.    त्यावेळी घटनेची माहिती समजतात आमदार शरद सोनवणे व नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी दवाखान्यात जाऊन या युवकाची विचारपूस केली होती.       दरम्यान तनिष परदेशी ज्या पीर वस्ती जवळ राहत आहे त्या वस्तीजवळ चारी बाजूंनी ऊस आहे. त्यामुळे तेथे बिबट्याचे वास्तव्य अनेक दिवसापासून असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असल्याने वन खात्याने या ठिकाणी पिंजरा लावला होता. पिंजरा पूर्णपणे उघडा व लोक वस्तीजवळ ठेवल्यामुळे त्याच्यात बिबट्या कसा येणार असा सवाल स्थानिक नागरिकांनी केल्यामुळे वनक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी पूजेचे ठिकाण बदलून दुसरीकडे लावला होता बुधवारी आठ वाजता सुमारास हा बिबट्या अखेर पिजर बंद झाला आहे. दरम्यान परिसरामध्ये आणखी दोन बिबटे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. @ फोटो खालील ओळ – नारायणगावच्या पिरवस्तीजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आठ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बिबट्या झाला जेरबंद. (छाया- सुरेश वाणी )

जाहिरात

error: Content is protected !!