लेण्याद्री : (प्रतिनिधी) अष्टविनायक तीर्थक्षेत असलेल्या लेण्याद्री गणपती येथे अष्टविनायक लेण्याद्री या नवीन ग्रामपंचायतची निर्मिती झाली असून जुन्नर तालुक्यात आता नवीन एका गावाची भर पडली आहे.पूर्वी हे तीर्थक्षेत गोळेगाव गाव म्हणून एकत्र होते.आता मात्र या गावाचे विभाजन होऊन नवीन गावाची निर्मिती झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या वर्षी जानेवारीत अष्टविनायक लेण्याद्री हे महसुली गाव जाहीर करून या गावाचा उल्लेख राजपत्रात केला होता, ग्रामविकास विभागाने 21 नोव्हेंबरला या नवीन महसूली गावात ग्रामपंचायत स्थापना करण्यासाठी शिक्कामोर्तब केले. त्या नुसार जिल्हापरिषदेने “अष्टविनायक लेण्याद्री” ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करून प्रशासक नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अष्टविनायक लेण्याद्री गावामध्ये लेण्याद्री नगर, गणपतीची वाडी, पत्ताडवाडी,खडक वाडी, टोकाची वाडी, नवनाथ वाडी, कुमशेतफाटा ठाकरवाडी, फकिरी, अष्टविनायक लेण्याद्री पायथा इत्यादी वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेले अनेक वर्षांची मागणी मान्य झाल्याने स्थानिक आदिवासी, ठाकर बांधवांनी समाधान व्यक्त केले असून अष्टविनायक लेण्याद्री च्या पायथ्याशी एकमेकांना पेढे भरवत व भंडारा उधळून आपला आनंद व्यक्त केला. या प्रसंगी गोळेगाव गावचे माजी उपसरपंच हर्षल जाधव, जितेंद्र भालेकर, मच्छिंद्र भालेकर,मारुती पारधी, चंद्रकांत मोधे,तुकाराम शिंदे,अशोक काळे, प्रकाश काळे, गणपत आधाण,शिवाजी घोगरे इत्यादी ग्रामस्थांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.