नारायणगाव : ( प्रतिनिधी)
जुन्नर नगर परिषदेची निवडणूक तीन तारखेला पार पडली असून मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याने जुन्नरच्या नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या सर्वच उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. आपण विजय होऊ का? मतदारांनी आपल्याला मतदान केले असेल का? निवडणुकीत केलेला खर्च वायला तर जाणार नाही ना? अशा विविध शंकांनी उमेदवारांची झोप पळाली आहे.
जुन्नर नगर परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडी,काँग्रेस भाजप व अपक्ष अशी बहुरंगी झाली. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातला सामना अधिक चर्चेचा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच जागांवर उमेदवार उभे केले होते तर शिवसेनेने 17 जागांवर उमेदवार उभे केले होते. शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुजाता काजळे या कट्टर हिंदुत्ववादी असल्याने त्यांचा विजय सोपा मानला जात आहे. काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी मुस्लिम उमेदवार उभा केला होता जुन्नर शहरात मुस्लिमांची मते नऊ हजाराचे आसपास असून यातील सर्वाधिक मते या उमेदवाराला पडतील असा दावा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत. या उलट शिवसेनेच्या उमेदवाराला कट्टर हिंदुत्व म्हणून जास्त मते पडतील असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्नेहल खोत यांचे सासरे पापा खोत यांचे जुन्नर शहरांमध्ये चांगले वजन आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा जुन्नर शहरात मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा स्नेहल खोत यांना होऊ शकतो, असं दावा खोत समर्थक करीत आहेत.
दरम्यान नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचाच विजय होणार याबाबतच्या पैंजा जुन्नर शहरात लागले आहेत. काहीच कार्यकर्त्यांनी तर आपल्या मित्रांशी वेगवेगळ्या प्रकारची बीट लावली आहे. यामध्ये अमुक उमेदवार विजयी झाला तर मी तुला सहलीला घेऊन जाईल. तसेच तमुक उमेदवार विजयी झाला तर मी एवढे रुपये तुला देईल. काहींनी तर आमचा उमेदवार शंभर टक्के विजय होणारच नाही झाला तर चक्क चमन करेल अशा पैजा लावल्या आहेत.
उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार विजयी होण्यासाठी जीवाचं रान करून प्रचार केला आहे. उमेदवारांनी देखील सगळ्या धोरणांचा अवलंब करून या निवडणुकीला सामोरे गेले आहेत. त्यामुळे त्यांना देखील विजयाची खात्री आहे तथापि मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन नेमकं काय केले आहे? आपल्याला मतदान केले असेल ना नक्की? काही दगा फटका तर केला नसेल ना? अशा नाना प्रश्नांनी या उमेदवारांना सतवले असून त्यांची झोप पळाली आहे. कधी एकदाची 21 तारीख येते आणि निकाल लागतोय असे या सगळ्या उमेदवारांना वाटत आहे.
स्नेहल खोत यांचे म्हणणे आहे की, राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचं रान करून काम केले आहे त्यामुळे मला माझ्या विजयाची खात्री आहे. माजी आमदार अतुल बेनके यांनी या प्रचारात मोठी मेहनत घेतली आहे. तसेच राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते खूप मेहनतीने काम करत होते. त्यामुळे विजय माझाच होणार असा दावा केला आहे. तसेच शिवसेनेचे उमेदवार सुजाता काजळे म्हणाल्या की, माझे पती मधुकर काजळे हे कट्टर हिंदुत्ववादी असून जुन्नर शहराच्या विकासात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. आमदार शरद सोनवणे व शिवसैनिकांनी मोठी मेहनत घेतली आहे त्यामुळे मी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणारच असा त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे.