नारायणगाव : (प्रतिनिधी )
जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार याबाबतची टांगती तलवार कायम असल्यामुळे प्रचाराला झोंबलेले इच्छुक उमेदवार पुन्हा थंडावले असून शुक्रवारी उच्च न्यायालयाचा निर्णय काय लागतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असे गृहीत धरून इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधायला सुरुवात केली होती. न्यायालयाने देखील यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीच्या आत घ्या असे निर्देश देखील निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे नगरपंचायती व नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यावर लगेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असे गृहीत धरून जुन्नर तालुक्यातील आठही गट व सोळा गणांमध्ये इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाद्वारे तसेच मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी सुरू केल्या होत्या.एवढेच नाही तर काही इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी आपल्यालाच मिळेल असे गृहीत धरून विविध भागांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन जोरदार फ्लेक्स बाजी करून मीच कसा चांगला उमेदवार असाही प्रयत्न चालवला आहे. काहींनी तर लकी ड्रॉ सारखे कार्यक्रम राबवून माझ्या पाठीमागे खूप मोठा जनसमुदाय आहे असे हे दाखवून देण्याचा प्रयत्न चालवला आहे. ज्या जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाचा उमेदवार कमकुवत आहे त्या ठिकाणी इतर पक्षातील एखादा कार्यकर्ता आयात करता येईल का?याबाबतची देखील स्थानिक पक्षांनी चाचपणी सुरू केली होती.परंतु आता निवडणुका नेमक्या होणार कधी? न्यायालय काय आदेश देणार ? या संभ्रम अवस्थेमध्ये इच्छुक उमेदवार असल्यामुळे संभाव्य निवडणुकीचा माहोल कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची केलेली रंगीत तयारी आता थांबवल्याचे दिसून येत आहे. काही इच्छुक मंडळींनी तर आपल्याला प्रतिसाद मिळावा म्हणून आपल्या जिल्हा परिषद गटांमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन देखील केले होते.दरम्यान काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या गटातील गाववर भेटी देखील सुरू केल्या आहेत. गाववार मतदारांशी संपर्क साधून “चिंता करू नका उमेदवार मीच आहे.” पक्षाने अधिकृत जरी माझी उमेदवारी जाहीर केली नसली तरी मला खाजगीत उमेदवारी संदर्भात सांगितले आहे असे देखील हे इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांना पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.दरम्यान येत्या शुक्रवारी न्यायालयाचा निर्णय काय लागतोय? याकडे सगळ्याच इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. जो मतदार संघ ओबीसीसाठी राखीव आहे, त्या ठिकाणी ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे अशा इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीचे जोरदार तयारी चालवले आहे परंतु न्यायालयाच्या निर्णयांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मनात असलेल्या प्लॅनला जर तडा गेला तर या मंडळींना मोठा आर्थिक फटका देखील बसणार आहे.दरम्यान जुन्नर तालुक्यातील एका ओबीसी महिला राखीव गटामध्ये कुणबी दाखला असलेले एक इच्छुक महिला उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या संपर्कात आहेत. परंतु नेते त्यांना अद्यापही हिरवा कंदील देत नाही. त्यामुळे त्यांनी देखील स्वतंत्र प्रचार सुरू केला असून मतदारसंघांमध्ये प्रत्येक ठिकाणी फ्लेक्स लावून आपणही स्पर्धेत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एकंदरीत न्यायालय यासंदर्भात निर्णय काय घेणार निवडणुका वेळेत होणार की पुढे ढकलणार याबाबतची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना मोठ्या प्रमाणात लागली असून त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. निवडणुका पुढे ढकलण्यात जाणार अशी चर्चा होऊ लागल्याने इच्छुक उमेदवारांनी सध्या, “धीरे चलो” अशी भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.