नारायणगाव : (प्रतिनिधी)- पुणे नाशिक महामार्गावर वारुळवाडी गावचे हद्दीमध्ये असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिथीगृहाच्या भिंती लगत अनेक छोट्या व्यवसायिकांनी दुकाने थाटल्याने सार्वजनिक जागेचा दुरुपयोग होत असून या व्यवसाय करणाऱ्या लोकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिथीगृह आहे. तसेच बाजूला याच विभागाची कार्यालय आहेत. या कार्यालयाच्या पूर्वेच्या भिंतीलगत अनेकांनी हातगाड्या लावल्या तर काहींनी फटाके विक्रीचे स्टॉल लावलेले आहेत. गॅरेज देखील रस्त्याच्या लगतच आहे. दिवाळी दरम्यान हे फटाके विक्रीचे स्टॉल लागले असून इतर फळ विक्रेते व इतर साहित्य विक्रेत्यांनी गेले अनेक महिन्यांपासून या ठिकाणी आपला व्यवसाय थाटला आहे. या व्यवसायिकांना सार्वजनिक बांधकाम खात्याने हातगाडी अथवा अथवा तात्पुरते शेड उभे करण्यास परवानगी दिली आहे का? आणि दिली असेल तर अशा प्रकारे सरकारी जागेमध्ये असा व्यवसाय करता येतो का? असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत. वास्तविक सार्वजनिक जागेचा अशाप्रकारे दुरुपयोग होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई करायला ववी. परंतु गेले अनेक दिवस या ठिकाणी फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या तसेच इतर व्यवसाय देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंती लगत सुरु आहेत. व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्याचा छुपा पाठिंबा तर नाही ना? असा सवाल व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत एक गॅरेज देखील उभारले आहे. तसेच सार्वजनिक बांधव विभागाच्या भिंतीला अधिक प्रमाणात फ्लेक्स लावून परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. दरम्यान या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे जुन्नरचे उपविभागीय अभियंता केशव जाधव यांच्याशी भ्रमणध्वनी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिथीगृहा शेजारच्या जागेत कोणालाही व्यवसाय करण्यासाठी अनुमती दिलेली नाही. या सर्वांवर तात्काळ कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.