नारायणगाव : ( प्रतिनिधी ) पुणे नाशिक हायवेच्या जुन्नर कृषी उत्पन्न मार्केट कमिटीच्या जागेकडे जाणाऱ्या सर्विस रोडचा भूमिपूजन समारंभ तसेच उपबाजार नारायणगाव अंतर्गत वारुळवाडी येथील धना मेथी मार्केटचा स्थलांतरित जागेचा उद्घाटन समारंभ गुरुवार (दि. 9) रोजी होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी दिली. ते म्हणाले की, बाजार समितीच्या या जागेकडे जाणाऱ्या सर्विस रोडचे भूमिपूजन खा.अमोल कोल्हे यांच्या हस्ते तर धना मेथी मार्केटचे उद्घाटन आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख उपस्थिती म्हाडा पुणे विभागाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजी आढळराव यांची असणार आहे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार अतुल बेनके भूषवणार आहेत. काळे पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाला भाजपा नेत्या आशाताई बुचके विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी आमदार बाळासाहेब दांगट,माजी आमदार दिलीप ढमढेरे, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, उद्योजक किशोर दांगट, वारुळवाडी सरपंच विनायक भुजबळ, नारायणगाव सरपंच शुभदा वावळ, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता अंकित यादव, उपकार्यकारी अभियंता दिलीप शिंदे, जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके उपस्थित राहणार आहेत. दरम्यान जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील धना – मेथीचा लिलाव तेरा एकर जागेमध्ये हलविण्यात येणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या अगोदर हा धना मेथी लिलाव बाजार समितीच्या जुन्या सात एकर जागेत होत होता. तेथे सकाळी टोमॅटो लिलाव, दुपारी तरकारी भाजीपाला लिलाव व सायंकाळी धनामेथी लिलाव होत होता. तीनही लिलाव एकाच ठिकाणी होत असल्यामुळे शेतकरी व व्यापारी यांची गैरसोय होत होती. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाने वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये पुणे नाशिक महामार्गावर 13 एकर क्षेत्रामध्ये धना मेथीचा लिलाव हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच पाच मोठे ताडपत्री शेड उभारण्यात आली आहेत. अचानक जर पाऊस आला तर या शेडचा शेतकरी बांधवांसाठी उपयोग होणार आहे. दरम्यान शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी धना मेथी लिलाव स्वतंत्र जागेमध्ये हलविण्यात आला असून या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपसभापती प्रीतम काळे यांनी केले आहे.