नारायणगाव : ( प्रतिनिधी) नारायणगाव येथील मीना नदी पात्रातील कोल्हापूर बंधाऱ्याजवळ सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटली असून मृत झालेली व्यक्ती अकोला तालुक्यातील तुळशीराम भीमा मधे
(वय 45) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मृत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे या व्यक्तीचा मृत्यू नेमकी कशामुळे झाला, हा खून आहे की अपघात याचा तपास नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू करण्यात आला असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी कोल्हापूर बंधाऱ्याजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नारायणगाव पोलिसांनी
मृतदेह नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.चौकशीत मृत व्यक्तीचे नाव तुळशीराम मधे असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने व मोठ्या स्वरूपात रक्तस्राव झाला असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची माहिती घेतली जात आहे.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.