नारायणगाव (प्रतिनिधी) भाजीपाला खरेदी करण्यासाठी घरातून निघालेल्या महिलेच्या हातातील पर्स व मोबाईल दुचाकी वरून आलेल्या चोरट्याने लंपास केला असल्याची घटना नारायणगाव येथील कोल्हे मळा येथे सोमवारी (दि 1) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दिवसा ढवळ्या घडलेली ही घटना यामुळे परिसरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हे मळा येथे राहत असलेली ज्योती राजपूत ही महिला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोल्हेमळा रस्त्यावरून भाजीपाला खरेदी करण्यासाठी येथील चौकात जात असताना पाठीमागून येत असलेल्या दुचाकी वाहनावरील चोरट्याने या महिलेच्या हातातील पर्स व मोबाईल लंपास करून पोबारा केला. महिला तातडीने या चोरट्याच्या मागे पळत गेली परंतु तोपर्यंत चोरटा चौकातून जुन्नरच्या दिशेला पसार झाला. दरम्यान या चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून स्प्लेंडर गाडीवर आलेला इसम या सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहे. सुमारे 15000 रुपये किंमतीचा ओपो कपंनीचा मोबाईल व पर्स मध्ये असलेले एक हजार रुपये या चोरट्याने लंपास केले. दरम्यान नारायणगाव परिसरामध्ये दिवसाढवळ्या असे प्रकार पुन्हा होऊ लागल्याने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने सतर्क राहून संबंधित चोरट्याचा शोध घ्यावा अशी मागणी केली जात आहे.