नारायणगाव : ( प्रतिनिधी) गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत सवाद्य मिरवणूक काढून नारायणगाव परिसरात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची विधिवत , मंगलमय वातावरणात आज (दि 27) प्रतिष्ठापना करण्यात आली.
नारायणगाव व वारुळवाडी परिसरात गणेश मूर्तीचे सुमारे 30 ते 35 स्टॉल लावण्यात आले होते. बहुतेक गणेश भक्तांनी आपल्या पसंतीच्या गणेशमूर्तीची आगाऊ नोंदणी केली होती. घरगुती व बाल गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आज सकाळ पासूनच भाविकांची लगबग सुरू होती. पूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदीतुन येथील बाजारपेठेत मोठी आर्थिक रडाल झाली. मागील दोन दिवसापासून येथील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाली होती.गणरायाचे घरोघरी आज आगमन झाल्याने कुटुंबातील सदस्यामध्ये उत्सह व आनंदाचे वातावरण होते.गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.गणेश मूर्ती, पूजेचे व सजावटीच्या साहित्य, थर्माकोलची मंदिरे आदींच्या खरेदीतुन मागील पाच दिवसांत येथील बाजारपेठेत सुमारे चाळीस लाख रुपयांची उलाढाल झाली. मोगरा, जास्वंद, झेंडूच्या फुलां पासून तयार केलेले लहान मोठे हार, माळा, कंठी या साहित्यांना गणेशभक्ताकडून मागणी होती.
मागील तीन ते चार दिवसापासून झेंडू, गुलाब, गुलछडी, शेवंती आदी फुलांचे भाव वाढल्याने आज लहान आकाराचा फुलांचा हार दीडशे ते पाचशे रुपयांना खरेदी करावा लागला. फळांचे भाव आज वाढले होते.चांगल्या प्रतीचे खव्याचे मोदक, पेढ्यांचा भाव चारशे ते पाचशे रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत. बहुतेक घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजेपर्यंत करण्यात आली. नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केलेल्या आहवानाला प्रतिसाद देऊन डिजेचा वापर टाळून मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्याचा वापर करण्यात आला होता. नारायणगाव बस स्थानक व पूर्व विषयी जवळ वाहतुकीचा अडथळात दूर करण्यासाठी पोलीस प्रशासन व नारायणगाव ग्रामपंचायतीने मेहनत घेतली.