नारायणगाव : (प्रतिनिधी) भाद्रपद चतुर्थी निमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथील श्रींचा जन्मोत्सव सोहळा आजपासून सुरू झाला आहे. गणेश जयंती उत्सवाला गणपती बाप्पा उंब्रज, धनगरवाडी, शिरोली खुर्द व ओझर येथील आंबराई येथे असणाऱ्या आपल्या बहिणींना, मंदिरातील देवींना गणेश जन्मानिमित्त आमंत्रित करण्यासाठी पालखीत जातात. या श्रींच्या उत्सवामध्ये द्वार यात्रेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आजचा उंब्रज येथील पहिला द्वार अतिशय मंगलमय वातावरणात पार पडला. या द्वार यात्रेला हजारो वर्षांची परंपरा असून द्वार यात्रा मार्गावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होती. नदीपात्रातून बाप्पांची पालखी उंब्रज येथे आल्यानंतर येथील गावकऱ्यांनी पालखीचे अतिशय मंगलमय वातावरणात स्वागत केले. यावेळी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट उंब्रज, श्रीराम देवस्थान ट्रस्ट व सहकार सार्वजनिक गणेशोत्सव मीत्रमंडळ सहकारनगर, स्वामी समर्थ देवालय ट्रस्ट व व्यक्तिगतरीत्या अनेक भाविक भक्तांनी द्वार यात्रेस आलेल्या सर्व गणेश भक्तांना खिचडी,केळी वेफर्स, शुद्ध पाणी व प्रसादाचे वाटप केले. या द्वार यात्रेस अनेक भाविक भक्त अनुवाणी चालतात हे याद्वार यात्रेचे वैशिष्ट्य आहे. या द्वार यात्रेत महालक्ष्मी मंदिरामध्ये लक्ष्मीनारायण पूजा पार पडली. यावेळी उंब्रज ग्रामस्थांच्यावतीने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे व सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला.पहिल्याच दिवशी या द्वार यात्रेला सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक भाविक भक्तांनी पालखीबरोबर आपली उपस्थिती दाखविली. ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक लहू थाटे व पोलीस कर्मचारी यांनी चांगला पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे ही द्वार यात्रा निर्विघ्नपणे पार पडली.