“विघ्नहर”च्या तज्ञ संचालकपदी वैभव कोरडे व विकास चव्हाण यांची वर्णी. विवेकानंद पानसरे कामगार संचालक.


नारायणगाव : (प्रतिनिधी) तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी वैभव कोरडे व विकास चव्हाण यांची लागली वर्णी लागली असून कामगार संचालक म्हणून विवेकानंद पानसरे यांची निवड करण्यात आली आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची आज (दि. 21) बैठक पार पडली. कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी वैभव कोरडे व विकास चव्हाण यांची तज्ञ संचालक पदासाठी नावे घोषित केली. संचालक मंडळाने एक मताने या दोन्ही नावाला एकमताने संमती दिली. तसेच कामगारांमधून विवेकानंद पानसरे यांची कामगार संचालक म्हणून निवड करावी असे सुचवण्यात आल्याने पानसरे यांच्या नावाला देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. विवेकानंद पानसरे हे काले येथील आहेत. विघ्नहर कारखान्याच्या स्थापनेपासून काले येथील पानसरे कुटुंबातील व्यक्ती कारखान्याच्या संचालक पदावर राहिलेले आहे. स्वर्गीय नारायण पानसरे यांच्या नंतर संजय पानसरे विघ्नहर कारखान्यावर गेले अनेक वर्ष संचालक म्हणून काम पाहत होते. परंतु यंदा पार पडलेल्या विघ्नहरच्या निवडणुकीमध्ये त्यांनी संचालक होण्यास नकार दिल्याने काले गावाला कामगार संचालक पदाची संधी दिली असल्याचे समजते. दरम्यान तज्ञ संचालक म्हणून निवडण्यात आलेले वैभव कोरडे हे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यांना सहकारातील अनुभव असून त्यांच्या पत्नी सौ. सारिका वैभव कोरडे या कारखान्याच्या 2015 ते 2020 या पाच वर्षाच्या काळात संचालिका होत्या. आता त्यांचे पती वैभव कोरडे यांना तज्ञ संचालक पदाची संधी मिळाली आहे. दरम्यान विकास चव्हाण हे पूर्व भागातील पारगाव परिसरातील शेती अभ्यासक आहेत. त्यांचा शेती क्षेत्रातील चांगला अभ्यास असल्याने कारखान्याला ऊस विकासासाठी चव्हाण यांचा अधिक फायदा होणार आहे. दरम्यान या तिघांचाही कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शाल श्रीफळ देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. “कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला कारखान्याचे संचालक करून सभासदांची कामगारांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही सत्यशील शेरकर व संचालक मंडळ यांचे आभारी आहोत,” अशी प्रतिक्रिया यावेळी या तिघांनी व्यक्त केली. दरम्यान विघ्नहरच्या माजी संचालिका अनघा घोडके अथवा जयवंत घोडके यापैकी एक नाव तज्ञ संचालक पदी नक्की येणार अशी चर्चा होत होती. परंतु यातील एकाही नावाचा समावेश झाला नाही.

जाहिरात

error: Content is protected !!